भंडारदरा सह कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटनास बंद..!!
प्रतिनिधि —
संपूर्ण राज्यात पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेले हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य आणि भंडारदरा परिसरात पर्यटन बंदी करण्यात आली आहे.
आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सर्वच ऋतूंमध्ये राज्यात प्रसिद्ध असलेला निसर्गरम्य अकोला तालुक आणि या अकोल्या तालुक्याचा पश्चिमेला असलेला भंडारदरा धरण परिसर.
हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य, विविध किल्ले, रंधा धबधबा अशा अनेक पर्यटन गिर्यारोहण स्थळांनी प्रसिद्ध असलेल्या या पर्यटन विभागावर पूर्णपणे पर्यटनास बंदी टाकण्यात आलेली आहे.
राज्यात कोविडची तिसरी लाट सुरू झाल्याने ही काळजी घेण्यात आली आहे. राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले असून या निर्बंधां मध्ये पर्यटनस्थळांना देखील बंद करण्यात आली आहे. सर्व पर्यटन स्थळं बंद करण्यात येतील असे पष्ट करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने आज भंडारदरा येथे वनविभाग आणि भंडारदरा वनक्षेत्र मधील असणाऱ्या गावांच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, समिती सदस्य यांच्यात बैठक पार पडली व सर्वांनी हा निर्णय घेतला की, जोपर्यंत कोविडचे संकट आहे तोपर्यंत या भागात पर्यटन बंद ठेवण्यात येईल.
जसजसे कोविडचे प्रमाण कमी होईल तसे शासनाच्या सूचनांनुसार पर्यटन खुले करण्यात येईल.असे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. आडे यांनी सांगितले
पाचनई, घाटघर, इको सिटी, अमृतेश्वर, साम्रद व्हॅली, हरिश्चंद्रगड, कुमशेत, आंबित धरण, भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कळसुबाई शिखर, रतनगड, पट्टा किल्ला या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
शासनाने शिथीलता द्यावी — भांगरे
गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी भागात कोरोना मुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या भागातील व्यवसायिक अडचणीत आलेले आहेत. जीवनमरणाचा संघर्ष चालू आहे. शासनाने थोडाफार विचार करून पर्यटन बंदी मध्ये शिथिलता आणावी. निर्बंधांचे काटेकोर पालन करुन, ज्यांच्या दोन्ही लसी पूर्ण झाल्या आहेत, मास्क व आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून जे पर्यटनास येतील त्यांना प्रवेश द्यावा. पर्यटन बंदिस शिथिलता द्यावी. जेणेकरून आदिवासी बांधवांची रोजीरोटी सुरू राहील. याचा शासनाने विचार करावा.
दिलीप भांगरे, सरपंच, भंडारदारा.
जीवन-मरणाच्या संघर्षाची पुन्हा तयारी…
पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या या आदिवासी भागातील अनेक उत्साही तरुण व्यवसायिक यांना आता सलग तिसऱ्या वर्षी देखील आर्थिक, व्यावसायिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. आधीच व्यवसायिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. आर्थिक संकट समोर आहे. शिक्षणाची अडचण निर्माण झालेली आहे. आता पुन्हा नव्याने पर्यटन बंद झाल्याने जीवनाच्या संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे. आदिवासी तरुण, आदिवासी जनता या सर्व संघर्षाला निसर्गकोपा प्रमाणेच तोंड देत आहे. जीवनमरणाचा संघर्ष हा आदिवासी समाजाच्या पाचवीला पुजला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी संघर्ष करण्याची तयारी मात्र सर्वांनी ठेवली आहे.
