निमोणसह पाच गावांची पाणी पुरवठा योजना लवकरच पूर्ण होणार…
महसूल मंत्री थोरात यांनी केली पाहणी

प्रतिनिधी —

निमोण परिसरातील निमोण, क-हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून या कामाची पाहणी आज भोजापूर धरणावर जाऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, आर्किटेक्चर बी.आर.चकोर, बंडूनाना भाबड, सुभाष सांगळे, अनिल सांगळे, अनील घुगे, रोहिदास सानप, ज्ञानेश्वर सांगळे, गंगाधर जायभाये, दगडू आप्पा घुगे, भारतशेठ मुंगसे, संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, सिन्नरच्या प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांसह पाच गावातील सरपंच उपसरपंच व प्रतिनिधी हजर होते.

निमोणसह क-हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना भोजापूर धरणातून १५ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन मधून थेट ग्रॅव्हिटी द्वारे पाणी पुरवठा होणार आहे.

यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यामध्ये सातत्याने पायाभूत विकासाच्या योजना राबवल्या जात आहे. निमोण आणि परिसरातील गावांसाठी या योजनेमुळे मोठा लाभ होणार आहे. थेट ग्रॅव्हिटी द्वारे पाणी मिळणार असल्याने पाण्याची अडचण कायमची दूर होणार आहे.
या योजनेसाठी बी.आर.चकोर व इंद्रजीत थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच प्रत्येक गावाला पाणी मिळणार आहे. पुढील काळात प्रत्येकाने पाणी अत्यंत जपून वापरले पाहिजे. कारण पाण्याची बचत हीच पाणी निर्मिती असते. वेळोवेळी असलेली पाणी पट्टी ग्रामपंचायतीने जमा करून संबंधित विभागाकडे भरली पाहिजे. जनहिताचे हे काम जनतेने व्यवस्थित सांभाळले तर पुढील पिढ्यांसाठी ते लाभदायी ठरणारे असते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, निमोणसह पाच गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे. ही योजना या गावांसाठी वरदान ठरणार असून भविष्यात त्याचे चांगले फळ आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. हे एक ऐतिहासिक काम या गावांसाठी उभे राहिले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.आर. चकोर यांनी केले. तर सूत्रसंचालन अनिल घुगे यांनी केले. यावेळी पाचही गावांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांचा सन्मान करण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!