प्रवरा नदी प्रदूषण..
ग्रामस्थांनी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली..
जशास तसे उत्तर देऊ समितीचा इशारा..!
प्रतिनिधी-
प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या प्रदूषित पाण्याच्या विरोधात सुरू करण्यात आलेले आंदोलन हे नदीकाठच्या गावातील लोकांच्या जीवनमरणाचा आहे. आंदोलनाकडे राजकीय भूमिकेतून पाहून गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कृती समितीचे फ्लेक्सबोर्ड फाडणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस उपअधिक्षकांची भेट घेवून केली.
प्रवरानदी पात्रा लगतच्या गावांना प्रदूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पाण्याची दुर्गंधी तसेच प्रदूषित पाणी पुरवठ्यामुळे सर्वच गावातील ग्रामस्थ हैराण झाले असून आरोग्यही धोक्यात आले आहे.सर्व गावातील ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायतीनी या पाण्याचे प्रदूषण थांबवावे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ठरावाद्वारे मागणी करून तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येवून प्रवरा नदी बचाव कृती समिती स्थापन करून आंदोलन सुरू केले. मात्र या कृती समितीचे फ्लेक्सबोर्ड काही गावात फाडले गेले, तर काही ठिकाणाहून जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आले. यामुळे कोल्हेवाडी कनोली, मनोली, कनकापूर, उंबरी, शेडगाव या गावात घडलेल्या फ्लेक्सबोर्डच्या घटनांमुळे गावात तणाव निर्माण झाला. फ्लेक्सबोर्ड फाडणाऱ्या व्यक्तींमुळे या आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न उघड झाले. त्यामुळेच कृती समितीने काल दिवसभर तालुका पोलीस ठाण्यात थांबून संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलीसांवर राजकीय दबाव आल्याने गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ झाली असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे आणि जोर्व्याचे उपसरपंच गोकुळ दिघे यांनी केला.पोलीस प्रशासनाने या घटनांचे गांभीर्य न घेतल्यानेच तसेच फ्लेक्सबोर्ड फाडणाऱ्या व्यक्तीना राजकीय पाठबळ मिळाल्यानेच रात्री कनोली येथे प्रफुल्ल जगताप याच्यावर धारदार शस्राने हल्ल्याची घटना घडली.
यासर्व पार्श्वभूमीवर कृती समितीच्यावतीने पोलीस उपअधिक्षक राहूल मदने यांची भेट घेवून परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. जेष्ठनेते रामभाऊ भुसाळ, शिवाजीराव कोल्हे, दिलीप इंगळे, मच्छींद्र ठोसर, माऊली वर्पे, ज्ञानदेव वर्पे, ज्ञानदेव शिंदे, किरण गुंजाळ, नानासाहेब दिघे, दादाभाऊ गुंजाळ, राहूल दिघे, नानासाहेब खुळे, सतिष वाळुंज, सचिन शिंदे, रविंद्र गाढे, आदींनी उपअधिक्षक मदने यांना निवेदन सादर करून आंदोलनाची भूमिका समजून सांगितली.
प्रदूषित पाण्याच्या विरोधात सुरू केलेले आंदोलन राजकीय हेतूने नाही. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे राजकीय भूमिकेतून पाहून कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर कृती समिती ते सहन करणार नाही. आमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू राहाणार असून या आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न झाल्यास कृती समिती जशासतसे उतर देईल असे कार्यकर्त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
फ्लेक्सबोर्ड फाडणाऱ्या व्यक्तीं विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करतानाच आंदोलनाचे पुढचे टप्पेही कृती समितीने जाहीर केले. प्रदूषित पाणी प्रवरा नदीपात्रात सोडणे न थांबल्यास महीलांचा मोर्चा आणि बेमुदत ठिय्या आंदोलन तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही या प्रदूषित पाण्याच्या विरोधात तक्रार दाखल न्याय मिळावा म्हणून आम्ही प्रत्येक गावातून ग्रामस्थांची पत्र पाठविण्यात येणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
