संगमनेर शहरातून जाणाऱ्या चौपदरीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी महसूल मंत्री थोरात यांनी केली.

चौपदरीकरण रस्त्यांमुळे शहराचे सौंदर्य वाढणार – थोरात  

प्रतिनिधी —

मोठमोठ्या पायाभूत विकास कामांबरोबर संगमनेर शहराचे वैभव आणि सुंदरता वाढवणाऱ्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून या कामाची पाहणी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून या रस्त्यामुळे शहराचे वैभव वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
साखर कारखाना ते सह्याद्री महाविद्यालय या दरम्यान विविध ठिकाणी रस्त्याच्या कामाची पाहणी नामदार थोरात यांनी केली. यावेळी समवेत नगराध्यक्षा दुर्गा तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, जि.प.सदस्य भाऊसाहेब कुटे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपअभियंता सौरभ पाटील, तहसीलदार अमोल निकम यांचेसह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या रस्त्याच्या मधोमध डीव्हाईडर सह वृक्षारोपण, विद्युतीकरण होणार असून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग होणार आहे. या रस्त्यावर महाविद्यालयांची विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने नव्याने होणाऱ्या चौपदरीकरण रस्त्यामुळे सर्वांना सुविधा मिळणार आहे.
याच बरोबर नव्याने दिल्ली नाका ते समनापुर, संगमनेर खुर्द ते रायतेवाडी फाटा व अकोले रोड वरील म्हाळुंगी पूल ते नवीन बायपास या दरम्यानच्या रस्त्याचेही चौपदरीकरण व सुशोभीकरण होणार आहे. संगमनेर शहरात नाशिक, पुणे, नगर,अकोले या चारही बाजूने येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरण व सुशोभीकरणाने शहराचे सौंदर्य वाढणार आहे.
थोरात म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी निधी मिळवला आहे. या रस्त्यांमुळे शहराचे सौंदर्य वाढणार असून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग होणार आहे. संगमनेर शहरात अनेक मोठमोठी कामे मार्गी लागली असून विकास कामांचा वेग कोरोना संकटातही कायम राखला आहे. या सर्व कामांमध्ये नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे ते म्हणाले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!