लसीकरण न केलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना अपात्र ठरवण्यात येणार….
लस न घेतलेल्या व्यक्तीचे रेशन व अन्य सवलती बंद…!
पंचायत समितीचा निर्णय
प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधि —
संगमनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास त्यांना अपात्र ठरविण्याचा तसेच लसीकरण न केलेल्या व्यक्तीचे रेशन व अन्य सवलती बंद करण्याचा निर्णय संगमनेर पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शुक्रवारी संगमनेर पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. या सभेसाठी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
दोनच दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता यावेळी त्यांनी शंभर टक्के लसीकरण येत्या दहा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील शुक्रवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली तर पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये कोविड लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यासाठी सक्तीचे आदेश पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तालुक्यातील ज्या व्यक्तीचा पहिला व दुसरा डोस झालेला नसेल त्यांचे रेशन आणि अन्य शासकीय योजना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोणत्याही शासकीय कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी दुकाने आदी ठिकाणी लसीकरण नसलेली व्यक्ती आढळल्यास, विना मास्क, पाच किंवा सहा व्यक्ती एकत्रित समूहाने गर्दी करून आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत.
