गणेशचे कर्ज रोखणे हा कामगारांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार !

पद्मश्रींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा..

कामगारांचे पालकमंत्री विखे यांना पत्र

प्रतिनिधी —

पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला मागील दहा वर्ष गणेश कारखाना चालवायला जमले नाही. अनेक कामगारांचे प्रपंच उध्वस्त झाले. आता ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे हे गणेश सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहेत, मात्र गणेशला कर्ज मिळू नये यासाठी विखे पाटील कारखान्याने जो आटापिटा सुरू केलेला आहे, तो येथील कामगारांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार आहे. अशा आशयाचे पत्र कारखान्याच्या कामगारांनी दिले आहे.

गणेशच्या कामगारांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. या पत्रकावर साडेतीनशे कामगारांनी सह्या केल्या आहेत.

प्रसिद्धीस दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे की, ‘मागील दहा वर्षात श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे कामगार म्हणून आम्ही निष्ठेने कारखान्यासोबत उभे राहिलो. आम्ही कधीही कारखान्याच्या राजकारणाचा भाग झालो नाही. गणेश कारखान्याने क्षमता असूनही कधीच पूर्ण क्षमतेने गाळप केले नाही. त्यामुळे आमच्या हाताला अनेक दिवस कामही मिळाले नाही. आम्हाला कधीही नियमित पगार मिळाले नाहीत. अनेक कामगारांच्या प्रपंचाची अक्षरशः वाताहात झाली. मात्र आम्ही धीराने श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासोबत उभे राहिलो. आता आमदार थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नातून गणेश कारखाना सुरू होत आहेत. मात्र गणेशला कर्ज मिळू नये, यासाठी विखे पाटील कारखान्याने जो आटापिटा चालवलेला आहे तो वेदनादायी आहे. गणेश चे कामगार हे मतदार सुद्धा आहेत. असाही इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने गेले तीन महिने प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. कारखान्याचे सर्वच कामगार जीव तोडून कारखान्याचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मेहनत करत आहेत. कारखान्याच्या आतमध्ये असलेले मशिनरीच्या मेंटेनन्सची कामे, उसाची नोंद आणि कारखाना सुरू करण्यासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक आहे त्या सर्वांची पूर्तता करण्यासाठी कामगारही प्रयत्नशील आहेत. मात्र श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने जिल्हा बँकेला पत्र देऊन श्री गणेश सहकारी साखर कारखानाच्या कर्जात आडकाठी निर्माण केली आहे. गणेशला कर्ज मिळू नये आणि पर्यायाने गणेश सुरू होऊ नये असे आपणास वाटते का ? आमदार थोरात यांनी श्री गणेश सहकारी साखर कारखाना ताब्यात आल्यानंतर स्पष्टपणे सांगितले होते की, या कारखान्यात आम्हाला राजकारण करायचे नाही. ही संस्था सुरू झाली तर त्याचा आम्हाला सर्वाधिक आनंद आहे. कामगार पुढे म्हणतात, मंत्री विखे यांनी देखील कारखान्यास सहकार्य करू असा शब्द दिलेला होता. कारखाना सुरू झाला तर आमच्या कामगारांची स्वप्नपूर्ती होईल. श्री गणेश कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासालाही हातभार लागेल. मात्र स्थानिक नेतृत्व या बाबी समजून घ्यायला तयार नाही आणि गणेशला कुठूनच कर्ज मिळू नये यासाठी आटापिटा सुरु आहे. आम्हा कामगारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घ्यायचे सोडून त्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप विखे पाटील कारखान्याने करू नये असे कळकळीचे आवाहन आम्ही करतो. असेही या पत्रात म्हटले आहे.

…अन्यथा पद्मश्रींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करू

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळू नये, यासाठी जो आटापिटा चालवलेला आहे तो थांबवावा. कामगारांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. अन्यथा प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मारकासमोर कुटुंबासह ठिय्या आंदोलन करण्या खेरीज आमच्यासमोर पर्याय राहणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!