भारतीय जनता पार्टी संगमनेर नेमके गौडबंगाल काय ?

एक गट म्हणतो पालिकेत गैरव्यवहार.!

दुसरा गट पालिकेत जाऊन विकासात्मक कामांवर सकारात्मक चर्चा करतो..!

शहरात चर्चेला उधाण…

प्रतिनिधी —

संगमनेर नगर परिषदेच्या अमरधाम बांधकाम प्रकरणी बोगस निविदा प्रक्रिया करण्यात  पालिकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत संगमनेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनांमध्ये अमरधामचा पंचनामा, श्रद्धांजली सभा, स्मृतिप्रीत्यर्थ प्रसाद वाटप, धरणे आंदोलन असे विविध आंदोलनांचे प्रकार करण्यात आले व नगरपालिकेच्या गैरव्यवहाराला चव्हाट्यावर आणण्याचा मोठा प्रयत्न झाला. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा याप्रकरणी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेत ही फक्त प्रसिद्धी साठी स्टंटबाजी असल्याचे आरोप केले. भाजपने केलेल्या या आंदोलनामध्ये भाजपचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, ज्ञानेश्वर करपे, शिरीष मुळे, दीपक भगत यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

परंतू आता भाजपच्या दुसर्‍या एका गटाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून त्यात म्हटले आहे की,

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांची भेट घेतली व शहरातील विविध समस्या, संभाव्य विकासकामे, डिजिटल पेमेंटची अंमलबजावणी व सुरक्षितता तसेच कोविड उपाययोजना याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष ॲड.श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, शिवकुमार भंगीरे, जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, अरुण शिंदे, जग्गू शिंदे, सुमित राऊत, कार्यालय प्रमुख विकास गुळवे, सोमनाथ बोरसे, दिलीप रावल हे उपस्थित होते.

एकंदरीत पाहता संगमनेर भाजप मध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत असून एक गट नगरपालिके विरुद्ध आंदोलन करीत आहे, तर दुसरा गट नगरपालिकेच्या बरोबर विकासात्मक कामांच्या बाबत सकारात्मक चर्चा करत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष यांनी केलेल्या आंदोलनात  मुख्याधिकारी वाघ यांना भेटलेले पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झालेले नव्हते असे दिसून येते

तर मुख्याधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळी आंदोलन करणाऱ्यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते असे चित्र दिसते. त्यामुळे नेमकं गौडबंगाल काय ? अशी चर्चा आहे. गटबाजीचा शाप असलेल्या भाजपची गटबाजी पुन्हा उफाळली असल्याचे म्हटले जात आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!