भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ भंडारदरा येथे !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
आमदार सत्यजित तांबे यांची संकल्पना
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी आणि शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण लवकरच १०० वर्षे पूर्ण करीत आहे. या कालावधीत भरगच्च कार्यक्रम घेऊन ‘भारतातील पहिले वॉटर म्युझियम’ भंडारदरा येथे सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजित तांबे यांनी सुरु केले असून त्या संदर्भाने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. फडणवीस यांनीदेखील या उपक्रमाची तातडीने दखल घेत भंडारदरा येथे वाटर म्युझियम सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत.

उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होत आहेत. भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते? याची कल्पनासुध्दा नगर जिल्ह्यातील लोक करू शकत नाहीत. सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसर हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांना देखील खुणावत असतो.

भंडारदारा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याचा आमदार तांबे यांचा मानस आहे. त्या निमित्त या परिसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यांना ही संकल्पना खूप आवडली व त्यांनी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. असे आमदार तांबे यांनी सांगितले.

