जयहिंद महिला मंचकडून पायी दिंडीत नऊ गावांमध्ये वृक्षारोपण !

संगमनेर ते शिर्डी पायी वृक्षदिंडी

 प्रतिनिधी —

महिलांचे सबलीकरण व त्यांचे आरोग्य याचबरोबर समृद्ध कुटुंब व्यवस्थेकरता जयहिंद महिला मंचच्या वतीने नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात असून संगमनेर ते शिर्डी या पायी वृक्षदिंडी विविध ९ गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

संगमनेर ते शिर्डी या पायी दिंडी समनापुर, वडगाव पान, निळवंडे, कवठे कमळेश्वर, कासारे, काकडी, कोऱ्हाळे, नांदुर्खी, शिर्डी, या गावांमध्ये दंडकारण्य अभियानांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले.

यावेळी बोलताना तांबे म्हणाल्या की, सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले. या अभियानाचे हे १७ वे वर्षे आहे. आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे.

जयहिंद लोक चळवळीच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरीता विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये बचत गटांसह आरोग्य तपासणी, व्यवसाय मार्गदर्शनही केले जाते. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन, परसबागांमधून भाज्यांचे उत्पादन, सेंद्रिय शेती अशा विविध उपक्रमांमधून महिलांचे संघटन व मार्गदर्शन केले जात असून हिरव्या वनराईसाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

महिला नेत्या तांबे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी समविचारी महिला एकत्र येऊन संगमनेर ते शिर्डी पायी दिंडी प्रवास करतात. या दिंडीत वृक्षांचे रोपण करत त्या वृक्ष संवर्धनाचा जागर करतात. याही वर्षी विविध नऊ गावांमधून वृक्षारोपण करण्यात आले असून त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!