समाज माध्यमातून दंडकारण्य चळवळ गावागावात पोहचावी — दुर्गाताई तांबे
प्रतिनिधी —
झाडांचे महत्व प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घेतले पाहिजे, झाडे आपल्याला जीवन जगण्यासाठी सर्व काही “देतात, झाडे आहेत म्हणून माणसे पशू, पक्षी सुरक्षित आहेत. म्हणून झाडांवर प्रेम करा. झाडे लावा झाडे वाढवा – असे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाच्या कार्यक्रमात दुर्गाताई तांबे यांनी केले. कोल्हेवाडी येथील श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने आयोजित केलेल्याभय वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रमानिमित्ताने त्या बोलत होत्या. गेली १७ वर्षे त्या दंडकारण्य अभियान चळवळीच्या प्रकल्प प्रमुख म्हणून त्या काम पाहात आहेत.

“सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) यांच्या कल्पनेतून दंडकारण्य चळवळ उभी राहिली. वयाच्या ८३ व्या वर्षी दादांनी ‘झाडे लावणारा माणूस’ हे पुस्तक वाचले आणि ते झाडे लावण्यासाठी झपाटून कामाला लागले. आपणही झाडे लावली पाहिजेत, ही कल्पना त्यांनी सोबतच्या सर्वांना सांगितली आणि दंडकारण्य चळवळ सुरू झाली. आजतागायत ८० लाख झाडांची लागवड संगमनेर तालुक्यातील विविध भागात झाली असून डोंगर, टेकड्या व माळरानांवर झाडे लावण्यात आली. यावर्षी १ कोटी झाडे लावण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय, कोल्हेवाडी व ज्युनिअर कॉलेजने यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीं रंगीबेरंगी पेहराव तसेच वारकऱ्यांच्या वेषात आले. निरनिराळ्या घोषणा देत निघाले.”झाडे लावा, झाडे जगवा”‘कावळा म्हणतो काव काव’ माणसा माणसा झाडे लाव” अश घोषणा देत कोल्हेवाडी गावातून विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी संपन्न झाली. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, जय जय झाड़े वृक्ष वेली” असे अभंग गात टाळ मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी मारुती मंदिरापर्यंत पोहोचली. तिथे विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात रिंगण धरले. वारकरी परंपरेप्रमाणे फुगडी खेळत, नाचत- गात गावकऱ्यांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले व वृक्षारोपणाचा संदेश दिला.

त्यानंतर दिंडी विद्यालयात पोहचली तेथे दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना रोपे वितरीत करण्यात आली. यावेळी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. “दंडकारण्य चळवळ ही काळाची गरज असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसरात झाडे लावलीच पाहिजेत, येणाऱ्या पिढ्यांना ‘झाडे लावा पृथ्वी वाचवा’ हा संदेश दिला पाहिजे. विद्यालयाला ८० हजार रुपये किंमतीची रोपे मिळाली. यात चिंच, आंबा, कडूलिंब, साताडा, जांभूळ ही रोपे विद्याथ्र्यांनी आपल्या घराजवळ लावावीत व त्यांचा सांभाळ करून वाढवावीत व त्यांच्या वाढीची नोंद ठेवावी.” असे आवाहनही यावेळी प्राचार्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदुकर थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक गुंजाळ यांनी केले.यावेळी शिवाजीराव खुळे, विठ्ठलबाबा खुळे, डॉ. तुषार दिधे, प्रकल्प प्रमुख शंकर शिंदे, प्राध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

