आश्वी बुद्रुक येथे महसूलच्या वाळू डेपोला विरोध !
सर्वसामान्य ग्रामस्थांनाच वाळू मिळत नसल्याने संताप
प्रतिनिधी —
सर्वसामान्यांसाठी असलेली वाळू वेळेत आणि लवकर मिळत नाही. तसेच ती इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. गावातील ग्रामस्थांनाच या वाळू पासून वंचित रहावे लागते. या रागातून आज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्रमक होत शासनाच्या महसूल विभागाच्या वाळू डेपोला विरोध केला. या वेळी मागील दिलेला ठरावही रद्द करण्यात आला.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची ग्रामस्थांना माहीती व्हावी या साठी आश्वी बुद्रुक बाजारतळावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा सुरु असतांना ऐन वेळी वाळू डेपो संदर्भातील आलेल्या विषयावर कामगार तलाठी माहीती देत असतांना ग्रामस्थ आक्रमक होत गावाचे वाळवंट करायचे काय असा प्रश्न उपस्थित करत आश्वी बुद्रुक नदीपात्रातुन या पुढे वाळूचा एक खडाही उचलू न देण्याचा निर्धार केला.

राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झाल्यानंतर वाळू माफीयांवर अंकुश आणण्यासाठी तसेच सर्व सामान्य जनतेची होणारी लुट, वाळूतस्कंरीतून निर्माण होणारे तरुणांची व्यसनाधीनता व गुन्हेंगारीत वाढलेला सहभाग थांबविण्यासाठी ६०० रुपये ब्रास ने शासकीय डेपोतून वाळू देण्याचे धोरण राबविले.

या धोरणाचे आश्वी बुद्रुक ग्रामस्थांनी स्वागत करत वाळू उपशास परवांनगी दिली असता जलसंपदा विभागाच्या मोकळ्या जागेत साडेतीन हजार ब्रास वाळूचा डेपो सुरु करण्यात आला. या डेपोतून घरकुलाला प्राधान्य क्रम देत अकोले, संगमनेर, राहता, राहुरी तालुक्यातील घरकुलांना वाळू देत नंतर सर्व सामान्य जनतेसाठी वाळू खुली केली. मात्र वाळू बुकींग ही संगमनेर येथील सेतू कार्यालयातून केल्याने व ती त्वरीत संपल्याचे जाहीर करण्यात आल्याने आश्वी बुद्रुक ग्रामस्थांना डेपोतून वाळू मिळाली नाही.

या मुळे ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट होती. याच दरम्यान आज झालेल्या ग्रामसभेत दुसऱ्या टप्प्यातील वाळू डेपोतुन आठ हजार ब्रास वाळू उपसा होणार असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होऊन वाळु उपशास कडाडून विरोध करण्यात आला. या वेळी ग्रामविकास आधिकारी राकेश पाटील, प्रशासक आर आर ठाकुर, तलाठी डी बी भालचिम उपस्थित होते.

यापुढे अश्वी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतून वाळू उपसा करण्यास ग्रामपंचायतीची हरकत आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेला ठरावही रद्द करण्यात येत आहे. असा नवा ठराव आज ग्रामसभेत करण्यात आला.

