तडीपार : संगमनेर उपविभागातून ३३ गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर
संगमनेर शहरातील १९ जणांचा समावेश
कारवाई सुरूच राहणार — उपअधीक्षक वाकचौरे
प्रतिनिधी —
पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि गत दोन वर्षात पुन्हा गुन्हेगारी करणाऱ्या संगमनेर उपविभागातील ३३ व्यक्तींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे प्रस्ताव संगमनेर उपविभागाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रस्ताव पाठविण्याची संगमनेर उपविभागाची ही पहिलीच वेळ आहे.

संगमनेर उपविभागात संगमनेर शहर, संगमनेर तालुका, आश्वी, घारगाव, अकोले आणि राजुर या सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सहा पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे हे प्रस्ताव पाठविले आहेत.

या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांची जंत्री उपअधीक्षक वाघचौरे यांनी तयार केली असून या सर्वांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात यावे असे अधीक्षकांना पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. संगमनेर उपविभागातील गुन्हेगारांची माहिती संकलित केल्यानंतर एकाच आठवड्यात त्यातील ३३ जणांवर हद्दपारीची कारवाईची टांगती तलवार आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५, ५६, कलम ५७ अंतर्गत सदरचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये कलम ५५ अंतर्गत गॅंग तडीपारीचे चार प्रस्ताव असून यात एकोणवीस गुन्हेगारांविरुद्ध, कलम ५६ अंतर्गत 13 गुन्हेगारांविरुद्ध तर कलम ५७ अंतर्गत एका गुन्हेगाराविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे.

पोलीस अधीक्षक ओला यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये प्रत्येक गुन्हेगाराने चार किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केलेले असून त्यांनी केलेले सर्व गुन्हे विचारात घेत हे प्रस्ताव पाठविण्यात आले.

गेल्या आठवडाभरात संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर या अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात असून तीन दिवसात ३३ जणांचे हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.

उपविभागातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी उचललेले हे सर्वात मोठे पाऊल समजले जात आहे. भविष्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या अशा गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे करू नये हा त्यामागील उद्देश असून यामुळे संगमनेर उपविभागात शांतता प्रस्थापित होण्यास तसेच कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे. यात सर्वाधिक प्रस्ताव संगमनेर शहरातून १९ तर संगमनेर तालुका पोलिसांकडून ८ व्यक्ती विरोधात सादर करण्यात आले आहे. अजूनही प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून ही कारवाई पुढील महिन्यात केली जाणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

