महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवतांना नागरिकांनी दोघा चोरट्यांना पकडले

संगमनेर शहर पोलीस स्टेशन जवळच घडली घटना…

प्रतिनिधी —

संगमनेर – शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेहरू गार्डन जवळील औषध दुकानामध्ये औषध घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने औषध विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत जोडीदारासह पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत या दोघा भामट्यांना पाठलाग करत त्यांना पकडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

या संदर्भात औषध विक्रेत्या महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा दागिने चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32 वर्ष, रा. वार्ड नं. 3, सावता रोड, श्रीरामपूर) व लखन विजय माळवे (वय 32 वर्षे, रा. वार्ड नंबर 7, लबडे वस्ती, अशोक टॉकीजच्या मागे, श्रीरामपूर) अशी या दोघा दागिने चोरांची नावे आहेत.

औषध खरेदी करण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून औषध दुकानात आलेल्या भामट्याने दुकानातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत सोबतच्या जोडीदाराच्या दुचाकीवरून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्याने काही लोकांनी दागिने चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या तावडीतून निसटलेल्या दोघा भामट्यांनी दुचाकी भरधाव नेत असतानाच नेहरू गार्डन जवळील शबरी हॉटेल जवळ सतर्क नागरिकांनी त्यांना पकडले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे महिलेचे मंगळसूत्र आढळून आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती देत या दोघा दागिने चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान सुभाष जनार्दन अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32 वर्ष, रा. वार्ड नं. 3, सावता रोड, श्रीरामपूर) व लखन विजय माळवे (वय 32 वर्षे, रा. वार्ड नंबर 7, लबडे वस्ती, अशोक टॉकीजच्या मागे, श्रीरामपूर) अशी या दोघा भामट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पल्सर मोटरसायकल देखील ताब्यात घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!