निळवंडे कालव्यांच्या कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार — महसूल मंत्री विखे पाटील
प्रतिनिधी —
निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची काम ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपुर्वक हलगर्जी करणाऱ्या तसेत वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे सुतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची पाहाणी केली. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहाणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अडचणी समजून घेतल्या. महसूल जलसंपदा विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी या पाहाणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

बहुतांशी गावात कालव्यांचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी अर्धवट काम केले आहे. अनेक ठीकाणी काम अद्यापही सुरू नाही. या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने मुदतवाढ घेतली तरीही कामाची परीस्थीती जैसे थे असल्याचे दिसून आले. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून प्रलंबित काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

अनेक ठेकेदारांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेली काम पूर्ण करत नसल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांना कामाकरीता मुदतवाढ का देता असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. या प्रकल्पात ठेकेदार अडथळे निर्माण करणार असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्णय करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

निळवंडे कालव्यांची काम पूर्ण करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याने कालव्यांची काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
निमगावजाळी येथील कालव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात झालेला विलंब आणि दिसून आलेल्या निष्काळजीपणाची मंत्री विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

