प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा संघर्ष पेटला..!
ग्रामीण भागात हाणामाऱ्या ; पोलिसांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी —
प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांना काल रात्री मारहाण झाल्याची घटना घडली असल्याची माहिती समजली असून दूषित पाण्याचा संघर्ष पेटला आहे.
तक्रार करण्यात येऊन देखील संगमनेर ग्रामीण पोलीस याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संगमनेर साखर कारखाना दूध संघ आणि नगर परिषदेच्या वतीने प्रवरा नदी पात्रात दूषित पाणी सोडण्यात येते. या दूषित पाण्यामुळे प्रवरा नदी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे आरोग्य आणि जीवन धोक्यात आले आहे.
या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींनी ठराव केले. तसेच प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. तरीही हा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यात आलेला नसून प्रशासनासह सर्वच विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवरा नदी पात्रालगत राहणाऱ्या ग्रामस्थांचे जीवन आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र प्रवरा नदीचा ऱ्हास कधी थांबणार, “पर्यावरणाची ची ऐशी तैशी” कधी थांबणार ? असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. या संदर्भाने प्रवरा नदी बचाव कृतीने समितीने थेट पुरावे उपलब्ध करत या संस्थांच्या माध्यमातून दूषित पाणी सोडण्यात येत असल्याचे जनतेसमोर आणले. तसेच या संदर्भाने जनजागृतीसाठी विविध गावांमध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. त्यामध्ये “हे घ्या पुरावे” असे म्हणत प्रदूषण करणाऱ्या पाण्याचे छायाचित्रे असलेले फ्लेक्स बोर्ड देखील लावण्यात आले. हे फ्लेक्स बोर्ड काही समाजकंटकांनी फाडून टाकले.
त्यामुळे हा संघर्ष चिघळला असून त्यातून हाणामाऱ्या देखील झालेल्या आहेत. संगमनेर पोलीस या संदर्भात कुठलीच कारवाई करत नाहीत. तक्रार देऊन देखील गुन्हे दाखल केले जात नाहीत. पोलिस दबावाखाली असल्याचा आरोप कृती समितीच्यावतीने करण्यात आलेला आहे.
प्रदूषित पाणी, नदी पत्रात सोडण्यात येणारे पाणी याची जोर्वे नाका परिसरातली छायाचित्रे, तसेच गुंजाळवाडी परिसरातील छायाचित्रे यावेळी प्रसिद्ध करण्यात आली. त्यातून मोठे वाद देखील झाले. कनोली, मनोली, रहिमपूर परिसरातील प्रदूषित पाण्यासंदर्भात लावण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड फाडण्यात आले.
फ्लेक्स बोर्ड फाडणार्याचे व्हिडिओ चित्रण व्हायरल..!
प्रवरानदी बचाव कृती समितीच्या वतीने संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात कनोली, मनोली, राहिमपूर व तेथील पंचक्रोशीत प्रदूषण या संदर्भाने काढण्यात आलेली छायाचित्रे व त्याचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. हे फ्लेक्स बोर्ड फाडण्यात आले. हे फ्लेक्स बोर्ड फाडणाऱ्या व्यक्तींचे थेट व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून हे व्हिडीओ चित्रीकरण सोशल माध्यमातून व्हायरल झाले आहे.
