दीड महिन्यानंतर खुनाचा गुन्हा उघड…
दारू पिल्यानंतर एका मित्राने केली दुसऱ्याला शिवीगाळ..
राग आला दगडाने ठेचून मारले…
संगमनेर पोलिसांनी आरोपीला केली भिगवणमध्ये अटक
प्रतिनिधी-
दीड महिन्यापुर्वी अकस्मात मृत्यु म्हणुन दाखल केलेल्या व्यक्तीचा खुन झाल्याचे दोन दिवसांपुर्वी समोर येताच पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवत आरोपीला अटक केली आहे. दोन मित्रात दारु पिल्यानंतर झालेल्या वादाची परिणती दुसऱ्याच्या खुनात झाली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मृत व्यक्तीच्या शरीरावर आढळलेल्या जखमा या मारहाणीत झाल्या असल्याचा वैदयकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तपासाला दिशा मिळाली होती. दरम्यान शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी या खुनाची उकल करत आरोपीचा माग काढल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली.
अमोल मोहन तरकसे (वय २७ वर्षे रा. तरकसवाडी, ता. राहाता) असे खुन झालेल्या तरुणाचे नांव असून मनोज बाळासाहेब राहणे (वय २३, रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नांव आहे. नाशिक-पुणे बाह्यवळण मार्गालगत घुलेवाडी गावाच्या शिवारात १२ नोव्हेंबरला रस्त्याचे कडेला पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, ओळख पटविण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याने अखेरीस पोलिसांनी वेल्हाळे येथे मृत व्यक्तीचा दफनविधी केला. दरम्यान याप्रकरणी ४ जानेवारीला शहर पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर या खुनाला वाचा फुटली. घुलेवाडी शिवारात आढळलेला मृतदेह अमोल तरकसे याचा असुन त्याचा खुन मनोज राहणे याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली.
तरकसे हा घारगांव येथील हॉटेलमध्ये वेटर म्हणुन कामास होता तर राहणे हादेखील त्यांच्याकडे वेल्डर म्हणुन कामाला होता. ओळखीतुन दोघे मित्र झाल्याने एकत्रित दारु पित असत. ११ नोव्हेंबरला हे दोघे एकत्र दारु पित असतांना त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे हॉटेल मालकाने त्यांना हॉटेलबाहेर काढून दिले. तेथून ते मोटारसायकलवरुन नाशिक-पुणे मार्गावर थांबले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यामुळे राहणे याने तरकसे याला तेथेच मारहाण करुन पाच-सहा वेळा दगडावर आटपले त्यामुळे तो मयत झाला. आरोपी राहणे याने पुन्हा मध्यरात्री १ वाजता घटनास्थळी जात तो मृत झाल्याची खात्री केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल व अन्य साहित्य काढून घेत तेथून पोबारा केला.
पोलिसांच्या तपासात आरोपी राहणे हा भिगवण, ता. इंदापुर, जि. पुणे येथे लपुन बसल्याची माहीती मिळाल्याने पोलिसांचे एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीने खुनाची कबूली दिली असून दारुच्या नशेत झालेल्या भांडणातुन हा खुन केल्याचे सांगितले असले तरी या प्रकरणाला महिलेच्या अवैध संबधाचीदेखील पार्श्वभुमी असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस कर्मचारी आण्णासाहेब दातीर, अमित महाजन, अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे व फुरखान शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
पोलिसांच्या माहितीला पाय फुटले….!
आज संगमनेर येथे पत्रकार परिषद घेऊन खून करून पळून गेलेल्या आरोपीला पकडल्याची शौर्यकथा पोलिसांना पत्रकारांना सांगावयाची होती. मात्र त्या आधीच काही स्थानिक वृत्तपत्रांना आणि सोशल माध्यमातून ही बातमी फुटली आणि सविस्तर वृत्त सोशल मीडिया मध्ये धडकले. पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेण्या आधी ही माहिती बाहेर गेली कशी ? तिला पाय कसे फुटले ? याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.
