तक्रार करून एक वर्ष झाले…
स्टोन क्रशर वाल्याने प्रशासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली…
संगमनेर तहसील प्रांत कार्यालय मौन !

प्रतिनिधी

हजारो ब्रास गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करून कोट्यावधींची रॉयल्टी बुडवली तरी संगमनेर महसूल प्रशासनाने संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे आढळून येत आहे.
तक्रार करून एक वर्ष झाले. तरी तक्रारीची दखल नाही. संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
नगर जिल्हा महसूल प्रशासनाचा दांभिकपणा उघड झाला असून संगमनेर तालुक्यात गौण खनिज बेकायदा उत्खनन करून कोट्यावधीची चोरी होत असल्याची तक्रार करूनही एक वर्ष होऊन गेले तरी कुठलीही कारवाई नाही की साधे तक्रारीला उत्तर नाही.
संगमनेर तालुक्यातील मौजे झोळे येथील चोरवाडे या ठिकाणी बेकायदेशीर स्टोन क्रशर चालवले जात असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवासी अण्णासाहेब काळे पाटील यांनी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.
तक्रार करून एक वर्षाचा कालावधी उलटून गेला. तरी अद्याप त्या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नसून ही चोरी आहे किंवा नाही, हे उत्खनन बेकायदेशीर आहे किंवा नाही याबाबत देखील जिल्हा महसूल प्रशासनाकडून कोणतेच उत्तर मिळालेले नाही.
महसूल प्रशासनाचे हे संगमनेर ते नगर संपूर्ण ठिकाणी मौन साधण्याचे काम सुरू असल्याचे उघड होत आहे.
अण्णासाहेब काळे यांनी संगमनेरचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांच्याकडूनही अद्याप कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे काळे यांचे म्हणणे आहे. अधिकार्‍यांची चुप्पी बेकायदेशीर कामांना खतपाणी घालत तर नाही ना ? असा संशय व्यक्त केला जात आहे.
तक्रार अर्जात
मौजे झोळे येथील चोरवाडे याठिकाणी मागील चार वर्षांपासून बेकायदेशीर खडी क्रशर चे काम चालू आहे. याठिकाणी शासनाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. अद्याप पर्यंत एक लाख ब्रास दगड, मुरूम असे गौण खनिजाचे प्रकार यातून काढलेले आहेत. त्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान झालेले आहे. तसेच या शेतकऱ्यांनी देखील वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या आहेत.
बिनशेती क्षेत्र नसतानादेखील सर्रासपणे या ठिकाणी स्टोन क्रशरचा प्रकल्प उभा करून बेकायदेशीर काम चालू आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल होणे गरजेचे अपेक्षित आहे.
तसेच निळवंडे धरण कालवा बोगदा व कालव्याचे काम सुरू असताना निघालेले दगड, मुरूम याची सुद्धा पाटबंधारे व महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. यामध्ये पाटबंधारे व महसूल विभागाची भूमिका संशयास्पद वाटत आहे.
तसेच याबाबत माहिती घेतली असता झोळे येथील सरपंचांनी त्यांच्या अधिकारात ग्रामपंचायतीचे परस्पर एनओसी दिले असल्याचे समजले.
त्या अनुषंगाने सदर स्टोन क्रशर कंपनीने लाखो ब्रास विनापरवाना गौण खनिजाची चोरी केलेली आहे. त्याची रॉयल्टी भरलेले नाही. तरी संबंधित कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी काळे यांनी एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी व संगमनेरचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे.
आजच्या स्थितीत हे स्टोन क्रशर बिनदिक्कतपणे चालू असून परिस्थिती जैसे थे आहे असे काळे यांनी सांगितले.

RRAJA VARAT

2 thoughts on “तक्रार करून एक वर्ष झाले… स्टोन क्रशर वाल्याने प्रशासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली… संगमनेर तहसील प्रांत कार्यालय मौन !”
  1. सुंदर डिझाईन, ले आउट!
    बातम्याही अगदी सर्वात अगोदर!
    मस्त. अभिनंदन आणि शुभेच्छा राजाभाऊ.💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!