बडोदा आणि राजारामबापू पाटील

– राजश्री कदम, वारणानगर

५८ वर्षांची प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्द लाभलेल्या बडोद्याच्या महाराजा सयाजीरावांनी आपल्या जनतेची वैचारिक उन्नती साधण्यासाठी संस्थानातील शिक्षण प्रसारावर जाणीवपूर्वक भर दिला. प्रत्येक समाजघटकाला साक्षर करण्यासाठी सयाजीरावांनी भारतात सर्वप्रथम १९०६ मध्ये सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा संपूर्ण बडोदा संस्थानात लागू केला. बहुजन समाजात शिक्षण प्रसार करू इच्छिणाऱ्या अनेक व्यक्तींना शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी आयुष्यभर सढळ हाताने मदत केली. सयाजीरावांच्या या धोरणाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत महाराष्ट्रातील शेकडो जण बडोद्यातील शैक्षणिक क्रांतीचे थेट ‘लाभार्थी’ होते. बडोदा कॉलेजमध्ये शिक्षण घेवून राजकारण, सहकार चळवळ आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्नरत राहिलेले वाळव्याचे राजारामबापू पाटील हे यापैकीच एक. आज राजारामबापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सयाजीरावांनी केलेले प्रयत्न आणि राजारामबापूंच्या जीवनात ‘बडोद्या’ने बजावलेली भूमिका समजून घेणे उद्बोधक ठरेल.

बहुजनांच्या शिक्षणासाठी १८८५ मध्ये गंगारामभाऊ म्हस्के यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ या संस्थेला सयाजीरावांनी स्थापनेपासूनच २४०० रु. वर्षासन सुरु केले. या संस्थेचे महाराष्ट्रासाठीचे महत्व ओळखून १८८५ ते १९३९ अशी ५४ वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ सयाजीरावांनी दिले. ही मदत ५ लाख २९ हजार ५५६ रु. इतकी होती. आजच्या रूपयाच्या दरात या रकमेचे मुल्य ७२ कोटी ४५ लाखांहून अधिक होईल. महाराष्ट्रातील एक दुर्लक्षित सुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या फर्ग्युसन कॉलेजमधील शिक्षणासाठी गंगारामभाऊंच्या डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची शिष्यवृत्ती होती. महाराष्ट्रातील मराठा जातीतील मुलांच्या शिक्षणासाठी एक संस्था असली पाहिजे या भूमिकेतून सयाजीरावांचे विश्वासू अधिकारी खासेराव जाधव यांनी जनरल नानासाहेब शिंदे यांच्यासोबत निधी संकलनाचे प्रयत्न बडोद्यात सुरू केले. या निधीला ‘मराठा फंड’ असे नाव होते. मराठा फंडासाठी सयाजीरावांनी मोठी रक्कम मदत म्हणून दिली. तर खासेरावांनी स्वत:चे २५ हजार रुपये दिले.

२१ ऑक्टोबर १९०६ रोजी मराठा समाजाच्या मंडळींनी मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत मराठा शिक्षण परिषद भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १९०७ मध्ये धारवाड येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी खासेराव जाधवांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या कार्यासाठी सयाजीरावांनी १,२५,००० रु.ची मदत केली होती. तर सयाजीरावांच्या पत्नी महाराणी चिमणाबाईंनी मराठा मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्रपणे १,००,००० रु. ची मदत केली होती. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, बडोद्यातील मराठा फंड आणि अखिल भारतीय शिक्षण परिषद या तीन संस्थांच्या माध्यमातून सयाजीरावांनी मराठ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केलेली रक्कम आजच्या रूपयाच्या मूल्यात १९१ कोटी रु.च्या घरात जाते.

या तीन संस्थांच्या माध्यमातून सयाजीरावांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे मराठ्यांमधील पदवीधरांची पहिली पिढी शिकली. याच शैक्षणिक क्रांतीचे एक लाभार्थी असणाऱ्या राजारामबापूंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील कासेगावसारख्या छोट्याशा खेड्यात एकत्र कुटुंबात अनंत पाटील आणि पुतळाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कासेगाव येथे झाले. त्यांचे एक शिक्षक श्री. मोहिते यांच्या सूचनेनुसार राजारामबापूंनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. श्री. मोहितेंच्या मदतीने प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहून राजारामबापूंनी माध्यमिक शिक्षण घेतले. या काळात शिक्षणावरील वाढत्या खर्चामुळे होणारी आर्थिक कोंडी टाळण्यासाठी राजारामबापूंनी प्राथमिक शिक्षक म्हणून देखील काम केले. १९४० मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

माध्यमिक शिक्षणानंतर राजारामबापुंसमोर कॉलेज शिक्षणासाठीच्या खर्चाचा प्रश्न उभा राहिला. आपण कितीही कठीण परिश्रम घेतले तरी कॉलेज शिक्षणासाठी आवश्यक रक्कम उभी करणे अशक्य आहे या परिस्थितीची त्यांना जाणीव होती. तर त्यांचे आई-वडील आणि चुलते हेदेखील तुटपुंज्या उत्पन्नामुळे कॉलेज शिक्षणासाठी राजारामबापूंना आर्थिक मदत करू शकत नव्हते. त्यामुळे कॉलेज शिक्षण घ्यावे की नको अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या राजारामबापूंना बडोद्याचे महाराजा सयाजीराव गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्या देत असल्याची माहिती मिळाली. आपले कॉलेज शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजारामबापूंनी बडोद्याला जाण्याचा निर्णय घेतला.

१९४० मध्ये राजारामबापूंनी बडोदा कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. सयाजीराव महाराजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या पाठबळावर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण बडोद्याच्या मराठा बोर्डिंगमध्ये राहून पूर्ण केले. बडोदा कॉलेजमध्ये शिकत असतानाच राजारामबापूंमध्ये कुस्तीची आवड निर्माण झाली. मुळातच शरीराने भक्कम असणाऱ्या राजारामबापूंनी बडोदा कॉलेजमधील प्रशिक्षणाआधारे कुस्तीमध्ये नैपुण्य मिळवले. तज्ञांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सरावामुळे राजारामबापूंनी बडोदा कॉलेजमध्ये कुस्ती चॅम्पियनचा किताब मिळवला. दुर्दैवाने हा इतिहास कुस्तीची ‘पंढरी’ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला माहित नाही.

बडोदा कॉलेजमध्ये २ वर्षे शिकत असताना सयाजीरावांनी उभा केलेले जनतेच्या शाश्वत विकासाचे ‘मॉडेल’ जवळून अनुभवण्याची संधी राजारामबापूंना मिळाली. जडणघडणीच्या आणि नवी स्वप्ने पाहण्याच्या वयात राजारामबापूंना बडोद्याच्या सुपीक भूमीत २ वर्षे शिक्षणानिमित्त राहण्याची मिळालेली संधी त्यांच्यातील ‘लोकनेता’ घडवण्यात महत्वाची ठरली. पुढील आयुष्यात राजारामबापूंनी महाराष्ट्रातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या धोरणांमध्ये या ‘सयाजी मॉडेल’च्या पाऊलखुणा आपल्याला ठळकपणे जाणवतात.

बडोद्यातून कॉलेज शिक्षण घेऊन परतल्यानंतर तीनच वर्षांनी १९४५ मध्ये राजारामबापूंनी वाळवा तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘कासेगाव एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १९४५ मध्ये कासेगाव येथे ‘आझाद विद्यालय’ या माध्यमिक शाळेची सुरुवात केली. गरीब मुलांना शिक्षणासाठी मोफत निवासाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १९४६ मध्ये राजारामबापूंनी ‘सर्वोदय वसतिगृहा’ची स्थापना केली. १९६५ पर्यंत कासेगाव एज्युकेशन सोसायटीकडून ६ माध्यमिक शाळा चालवल्या जात होत्या. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या मुलामुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी राजारामबापूंनी १९६५ मध्ये आष्टा येथे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. पुढे १९८३ मध्ये सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देण्यासाठी ‘राजारामबापू इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी’ हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यात आले. राजारामबापू मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षणाबरोबरच इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी आग्रही होते. पुणे विद्यापीठाच्या सिनेटपदी निवड झाल्यानंतर राजारामबापूंनी यासाठी विशेष प्रयत्न केले. राजारामबापूंनी सर्वसामान्य जनतेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न सयाजीरावांनी बडोद्यात घडवलेल्या शैक्षणिक क्रांतीशी नाते सांगणारे आहेत.

१८८४ मध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना सयाजीरावांनी गणदेवी येथे स्थापन केला. त्याचबरोबर सयाजीरावांच्या कारकिर्दीत बडोद्यात गणदेवी सहकारी ऊस उत्पादक संस्था, पुर निवारण संस्था, महिला व पुरुष काटकसर संस्था, सहकारी सुतगिरण्या, सहकारी विमा संस्था, सहकारी वीजपुरवठा संस्था, ग्रामीण पुनर्बांधणी संस्था इ. ५८ प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत होत्या. या संस्थांच्या माध्यमातून सयाजीरावांनी बडोद्यातील सहकार चळवळीची पायाभरणी केली. राजारामबापूंना आपल्या बडोद्यातील २ वर्षाच्या वास्तव्यात या सहकार चळवळीच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू अनुभवता आला. पुढे राजारामबापूंनी वाळवा सहकारी साखर कारखाना (१९६९), वाळवा सहकारी दुध संघ (१९७५), वाळवा तालुका कृषी पदवीधर कृषी उद्योग विकास सहकारी संघ (१९७८), शेतकरी-विणकरी सहकारी सूतगिरणी (१९७९), वाळवा सहकारी बँक (१९८१), वाळवा तालुका मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार इ. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न केले. राजारामबापूंनी उभी केलेली ही सहकार चळवळ आजही सर्वसामान्य जनतेच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

सहकार चळवळीबरोबरच राजारामबापूंनी राजकीय क्षेत्रातदेखील महत्वपूर्ण भूमिका बजावली. राजारामबापूंनी १९५२ ते १९६२ अशी १० वर्षे सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले. याच दरम्यान १९५९ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकून राजारामबापूंनी संसदीय राजकारणात प्रवेश केला. १९६२ मध्ये ते वाळवा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. पुढे १९६२ ते १९८४ अशी सलग २२ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९६२ मध्ये राजारामबापूंची महसूल व वन राज्यमंत्री म्हणून निवड झाली. अडीच वर्षाच्या कालावधीतच त्यांना महसूल खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

जुन्या महसूल कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमिनीचे क्षेत्र, त्या जमिनीवरील कर्ज व कर इ. बाबतची माहिती एकत्रित ठेवण्याची जबाबदारी गावाच्या तलाठ्यावर सोपवण्यात आली होती. परंतु ही संपूर्ण प्रक्रिया शासकीय कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात स्वतःच्या जमिनीवरील मालकीसंदर्भात एक प्रकारची भीती निर्माण होत असे. महसूल मंत्रीपदी निवड झाल्यानंतर राजारामबापूंनी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची इंत्यभूत माहिती देणारे खाते पुस्तक देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची अधिकृत माहिती मिळून त्याच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली. राजारामबापूंचा हा निर्णय त्यांच्यातील सर्वसमावेशक राज्यकर्त्याचा पुरावा आहे.

१९६६ मध्ये दुष्काळग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राजारामबापुंनी शासनाच्या वतीने छोट्या धरणांची निर्मिती, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्था दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचा निर्णय घेतला. या कामांवर दुष्काळग्रस्तांना रोजंदारीवर कामे देण्यात येत होती. शासकीय मदत मोफत न देता पायाभूत सुविधा निर्मितीचा राजारामबापूंचा निर्णय त्याआधी ६७ वर्षापूर्वी १८९९ मध्ये बडोद्यातील दुष्काळावेळी सयाजीरावांनी राबवलेल्या अशाच प्रकारच्या उपायांशी नाते सांगणारा आहे.

राजारामबापू महसूल मंत्री होण्यापूर्वी महाराष्ट्राचे ३ विभागांमध्ये वर्गीकरण करून प्रत्येक विभागासाठी वेगळी करपद्धती नेमून देण्यात आली होती. यामुळे करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होत असे. महसूलमंत्री राजारामबापूंनी पुढाकार घेत ही पद्धत रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच करपद्धती लागू केली. अलीकडेच भारताने स्वीकारलेल्या ‘एक देश एक करपद्धती’ व्यवस्थेचे हे प्रातिनिधिक स्वरूप आहे. १९६७ ते १९७२ या काळात राजारामबापूंनी उद्योग आणि वीज खात्याची जबाबदारी सांभाळली. तर १९७८-७९ मध्ये राजारामबापूंवर ग्रामविकास आणि कायदा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. दुर्दैवाने १७ जानेवारी १९८४ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी राजारामबापूंचे आकस्मित निधन झाले.

राजारामबापूंनी आयुष्यभर समाजाच्या प्रगतीसाठी राबवलेल्या धोरणांचा ‘उगमस्रोत’ समजून घेण्यासाठी डॉ. सर्जेराव घोलप यांनी त्यांच्या ‘राजारामबापूंच्या जीवन व कार्याचा अभ्यास’ या पीएच.डी. च्या प्रबंधात नोंदवलेले मत उपयुक्त ठरते. डॉ. घोलप लिहितात, “मन आणि शरीराने परिपूर्ण बनलेला राजाराम १९४२ मध्ये बडोद्यातून कला शाखेच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण होवून बाहेर पडला.” डॉ. घोलप यांचे हे विधान बडोदा कर्तबगार व्यक्ती निर्माण करणारे केंद्र कसे होते हे सूचित करणारे आहे.

सौजन्य : महाराजा सयाजीराव गायकवाड फेसबुक ग्रुप

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!