संगमनेर महसूल विभागाने वाळू तस्करी करणारी पाच वाहने पकडली !

तहसील विभागाची धडक कारवाई सुरू..

प्रतिनिधी —

वाळू तस्करीच्या विरोधात संगमनेर महसूल विभाग आक्रमक झाला असून विविध कारवाया सातत्याने सुरू आहेत. आज पहाटे आणि सकाळी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तहसील विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तस्करी करणारी पाच वाहने पकडली असून सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

दिवसेंदिवस गंभीर बनलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात संगमनेरच्या महसूल विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. एकाच वेळी अवैध वाळूची वाहतूक करणारी तब्बल पाच वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली आहेत. या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूलच्या पथकाने शहर व परिसरातून ही वाहने पकडली आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने गौण खनिजाबाबत कडक धोरण अवलंबिले आहे.

याचा फटका वाळू तस्करांना बसला असून महसूल खात्याने अवैध वाळू तस्करी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

महसूल विभागाने नगर जिल्ह्यात अवैध गौण खनिजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महसूल खाते ॲक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे वाळू तस्करांनी ट्रॅक्टरसह मोठ्या वाहनांचा वापर टाळत वाळू तस्करीसाठी छोटी वाहने वापरण्यास सुरुवात केली.

छोट्या वाहनातून वाळू तस्करी होत असल्याने त्या विरोधात महसूलच्या पथकाने मंगळवारी पहाटे विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार उमाकांत कडनोर व गणेश तळेकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार तलाठी पोमल तोरणे व अन्य तहसीलदारांच्या पथकाने ही वाहने पकडली.

पथकाने पकडलेल्या वाहनांमध्ये मंगळापूर येथे जीपमधून, राजापूर येथे पिकअप जीपमधून, कासारवाडी येथे ॲपे रिक्षातून, खांडगाव येथे पिकअपमधून तर शहरात रिक्षातून वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. पथकाने ही पाचही वाहने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे शासनाने गौण खनिजा बाबतीत आणलेले निर्बंध झुगारून अवैधरित्या वाळू वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या विरोधात महसूल प्रशासनाने कारवाई संदर्भात सातत्य राखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!