महसूल विभागाच्या बेकायदेशीर कारवाईने अनेकांचे संसार उघड्यावर — आमदार बाळासाहेब थोरात
गौण खनिज बंदी विरोधात प्रांत कार्यालयावर मोर्चा
प्रतिनिधी —
महसूल मंत्री असताना कुणाचेही वाईट केले नाही. प्रत्येकाला मदतच केली. मात्र काही लोक आपले वाईट करायला निघालेले आहेत. संगमनेर तालुक्याचा झालेला विकास त्यांना पाहवत नाही, आपले चांगले चाललेले त्यांना सहन होत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. महसूल विभागाने गौणखणीजांच्या संदर्भात बेकायदेशीर कारवाया करून अनेकांचे संसार उघडे केले आहेत. असा आरोप माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केला आहे.

गौण खनिज आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्या कामगार, मजूर, अभियंते, ठेकेदार, बिल्डर्स यांनी आज संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या वेळी भ्रमणध्वनी द्वारे आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.

सरकारने गौण खनिजांबाबत केलेल्या जाचक नियमांमुळे व लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बांधकाम क्षेत्र ठप्प झाले असून कामगार व मजुरांची उपासमार झाली आहे. सरकारच्या विरोधात तालुक्यातील अभियंते, ठेकेदार, बांधकाम क्षेत्राशी निगडित व्यवसायातील कामगार व मजुरांचा आक्रोश मोर्चा संपन्न झाला. यावेळी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात मजूर व कामगारांनी एल्गार केला.

संगमनेर तालुका इंजिनियर असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील बांधकाम क्षेत्र निगडित घटकांचा महा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा मालपाणी लॉन्स येथे सुरू होऊन नाशिक पुणे मार्गे बस स्थानकावरून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी वडार, सुतार कामगार, प्लंबर, लाईट कामगार, ठेकेदार, वीट भट्टी कामगार, रोड कामगार, बांधकाम मजूर, बेरोजगार, अभियंते, महिला लहान मुले संसार यांसह सहभागी झाले होते.

मोर्चात वडार बांधवांनी आपल्या गाढवांसह उपस्थित राहत सरकारचा तीव्र निषेध केला . तर महिला व मजुरांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला.
मोर्चाला पाठिंबा दर्शवत दूरध्वनी द्वारे बोलताना काँग्रेस पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कॅनॉल साठी मोठा निधी मिळवून २०२२ मध्येच पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. मात्र सरकार बदलले आणि निळवंडे कालव्यांचे काम पूर्णपणे थांबले.

याचबरोबर विविध विकास कामांनाही स्थगिती मिळाली. राज्यातील नगर जिल्हा व विशेषत: संगमनेर तालुक्यात महसूल विभागाने गौण खनिजाच्या नावावर अन्यायकारक निर्बंध लावले आहेत. यामुळे अनेक शासकीय विकास कामांसह, विविध रस्ते, सरकारी इमारती, घरकुल शाळा, खोल्या, अंगणवाडी अशी सरकारी कामे याचबरोबर अनेक लोकांच्या घरांची कामेही थांबली आहेत.

महसूल विभागाने बेकायदेशीर रित्या अनेकांना बेकायदेशीर दंड केले आहेत. यामुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावर आलेले आहेत. एखाद्या विभागाचा विकासात बांधकाम विभागाचा मोठा वाटा असतो मात्र तोच थांबवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.

आपण महसूल मंत्री असताना कुणाचेही वाईट केले नाही. प्रत्येकाला मदतच केली.मात्र काही लोक आपले वाईट करायला निघालेले आहेत. संगमनेर तालुक्याचा झालेला विकास त्यांना पाहवत नाही, आपले चांगले चाललेले त्यांना सहन होत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.

जिल्ह्यात दहशतीचे राजकारण काहीजण करत आहेत. हे दहशतीचे राजकारण आपल्या तालुक्यात त्यांना करायचे आहे. मात्र हा संगमनेर तालुका आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. दहशतीचे राजकारण आपण संघटित होऊन रोखणार आहोत असेही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध त्यांनी केला आहे.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही या महामोर्चाला पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी ॲड. अरविंद पवार यांनी खोके सरकारचा तीव्र निषेध करत महसूल विभागाच्या जुलमी कारभाराविरुद्ध ताशेरे ओढले. तर किसन पानसरे,अजिंक्य वर्पे, सुभाष दिघे, व्यंकटेश देशमुख, दिपाली वर्पे, अनुपमा शिंदे, निलेश कडलग, योगेश पवार, प्रा. बाबा खरात, मोहन करंजकर , प्रदीप हासे, रामहरी कातोरे, के.के. थोरात, नरेंद्र पवार, बी. आर. चकोर, यांनीही महसूल व सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला.
यावेळी इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने दिलेले मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार लोमटे व तळेकर, पोलीस निरीक्षक भोसले, यांनी स्वीकारले.

