राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र नंबर वन ! 

प्रतिनिधी —

 

संगमनेर येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत देश पातळीवर महाराष्ट्र नंबर वन ठरला..

गेल्या चार दिवसांपासून संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्‍या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. दोन स्वतंत्र वयोगट आणि योगासनांच्या पाच प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करत १९ सुवर्ण पदकांसह २७ पदके पटकावित अजिंक्यपदावर मोहर उमटवली. उपविजेतेपद पाच रौप्य व सहा कांस्य पदके मिळवणार्‍या पश्‍चिम बंगाल संघाने तर तिसरे स्थान एका सुवर्ण पदकासह चार पदके मिळवणार्‍या तामीळनाडू संघाने मिळवले. या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या खेळाडूंना खेलो इंडिया आणि एशियन गेम्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

मंगळवारपासून (ता. २७) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या तिसर्‍या राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभाने समारोप झाला. याप्रसंगी राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ, उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सेक्रेटरी जनरल डॉ. जयदीप आर्य, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक व स्पर्धा व्यवस्थापक डॉ. निरंजन मूर्ती आदी उपस्थित होते.

या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून योगासनांच्या वेगवेगळ्या पाच प्रकारांमध्ये सादरीकरण करतांना महाराष्ट्राच्या संघाने एकेरी, दुहेरी व सांघीक प्रकारातही वर्चस्व निर्माण केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तब्बल १९ सुवर्ण पदकांसह ७ रौप्य व १ कांस्य पदकाची कमाई करीत या स्पर्धेचे अजिंक्यपदही पटकाविले. उपविजेतेपद प्राप्त करणार्‍या पश्‍चिम बंगालच्या स्पर्धकांनीही सरस कामगिरी करतांना ५ रौप्य व ६ कांस्य पदकांसह एकूण ११ पदके पटकाविली. तर तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या तामीळनाडू संघाने एका सुवर्ण पदकासह दोन रौप्य व एक कांस्य पदक मिळवले.

यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ यांनी अतिशय नेटक्या आणि भव्य-दिव्य स्वरुपात आयोजित झालेल्या या स्पर्धेचे भरभरुन कौतुक केले. स्पर्धेत देशभरातील २९ राज्यांमधून ७८९ खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदविल्याचे सांगतांना या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या योगासनपटूंना फेब्रुवारीत मध्यप्रदेशात खेळल्या जाणार्‍या खेलो इंडिया स्पर्धेसह एशियन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची घोषणा केली.

डॉ. आर्य यांनी देशात काही विद्यापीठांनी योगाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश केल्याचे सांगितले. योगासनांमध्ये नैपूण्य दाखवणार्‍या खेळाडूंना शासकीय व खाजगी नोकर्‍यांमध्ये आरक्षणही दिले जात असल्याचे ते म्हणाले. यामुळे योगासनांमधून शारीरिक सामर्थ्य वाढण्यासह खेळाडूंच्या जीवनात आर्थिक समृद्धीही येणार असल्याने आजच्या विद्यार्थ्यांनी योगाचा स्वीकार केला पहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी या स्पर्धेचा उल्लेख योगासनांचा महाकुंभ असा करताना या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे देशभरातील शेकडों स्पर्धकांनी प्रज्ज्वलित केलेल्या योगयज्ञाचा पूर्णाहुती सोहळाच असल्याचे सांगितले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर यांनी या स्पर्धेतील अनुभव योगासनपटूंना आयुष्यभर दिशा दाखविणारे ठरतील असे सांगितले.

यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व बृहन्महाराष्ट्र योग परिषदेच्या माध्यमातून चार दशके योगसेवा करणार्‍या सतीश मोहगावकर यांना सर्वोत्कृष्ट पंच म्हणून तर हरिद्वारच्या पतंजली योगपीठाच्या दादा उदयवीर, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक मंगेश खोपकर, पश्‍चिम बंगालच्या प्रशिक्षक सपना पाल व तामीळनाडूचे प्रशिक्षक टी. युवराज यांचा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

पारितोषिक वितरण समारंभावेळी डॉ. जयदीप आर्य यांनी आपल्या आवाजात ‘अपने तन को.. मन को.. धन को., देश को.. दे.. दे.. दान रे..!’ आणि ‘हम होंगे कामयाब’ ही गीतं सादर केली. उपस्थित शेकडो खेळाडूंनी त्यांच्या सोबतीने त्याचे गायन केल्याने योगासन क्रीडा नगरीचे वातावरण भारावल्यासारखे झाले होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!