जो हारा वो सिकंदर !
‘महाराष्ट्र केसरी’च्या वादाचा सोशल मीडियावर धुरळा |
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
‘महाराष्ट्र केसरी स्पर्धा नव्या वादात सापडली आहे. माती विभागात मल्ल सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रला पंचांनी दिलेले ४ गुण वादग्रस्त ठरले आहेत. यावरून सोशल मीडियात चांगलाच धुरळा उडाला आहे.

सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी माझ्या मुलावर अन्याय झालाय, असे म्हणत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर सोशल मीडियावर ‘हारकर भी जीतनेवाले को सिकंदर कहते है’ अशा पोस्ट ४ गुण देणाऱ्या पंचाला धमकी व्हायरल झाल्या.

संग्राम कांबळे नावाच्या पोलीस शिपायाने तर या सामन्यातील पंच मारुती सातव यांना फोनवरून थेट धमकीच दिली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने मानाची चांदीची गदा जिंकली, तर महेंद्र गायकवाडला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले. मात्र, या स्पर्धेतील खरा स्टार कुस्तीपटू ठरला तो वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा सिकंदर शेख.

“महेंद्र गायकवाडला जाणीवपूर्वक अधिक गुण देण्यात आले. आमच्या मुलावर अन्याय झालाय. असं जर होत राहिलं तर गरीबांना वालीच राहणार नाही. आम्ही हमाली करून सिकंदरला घडविले आहे. ज्या पंचांनी हे चार गुण दिले त्यांनी स्वतःच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे की हा निर्णय योग्य आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी दिली.

सिकंदरचा मुद्दा काय?
■ महेंद्र गायकवाडने माझ्यावर बाहेरची टांग मारताना ज्या नियमाने गुण द्यायला पाहिजे तसे झाले नाही. व्हिडीओ रिप्ले सर्व बाजूंनी पाहू दिला नाही. प्रशिक्षक दाद मागायला गेले, पण त्यांनादेखील काही बोलू दिले नाही, असे सिकंदरचे म्हणणे आहे.
■ जिथे टांग लागली आहे तिथे पूर्णपणे टांग बसलेली नव्हती. पूर्ण पाठीवर न पडता मी एका खांद्यावर पडलोय. त्यामुळे महेंद्र गायकवाडची ॲक्शन होती म्हणून त्याला २ गुण देणे अपेक्षित होते आणि माझा कब्जा आहे म्हणून मला १ गुण मिळायला हवा होता, मात्र असं न होता पंचांनी महेंद्रला ४ गुण दिले, असे तो म्हणाला.
■ माझ्यावरील अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मी ३-१ असा आघाडीवर असताना ४-५ असा पिछाडीवर पडलो. पंचांच्या निर्णयाचा फटका मला बसला. पुढे मला २ मिनिटांत आघाडी मिळविता आली नाही, असे त्याने सांगितले. सौजन्य दैनिक सामना

