भंडारदरा धरणातून रब्बी आणि उन्हाळी हंगामा सह पाच आवर्तनाचे नियोजन !

महसूल मंत्री विखे पाटील यांचे निर्देश ; रब्बी चे पहिले आवर्तन २१ डिसेंबर पासून सुरू

 प्रतिनिधी —

भंडारदरा लाभक्षेत्रात रब्बी आणि उन्हाळी हंगामासह एकूण पाच आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सुचना महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन आज दिनांक २१ डिसेंबर पासूनच सुरु करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले.

कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे विधानभवनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, कृषी विभागाचे अधिकारी जगताप, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

प्रारंभी अभियंता नान्नोर यांनी धरणातील पाणीसाठ्याबाबत सादरीकरण करुन बैठकीमध्ये पाणी परिस्थितीची आकडेवारी सादर केली. सद्य परिस्थितीत भंडारदरा आणि निळवंडे प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या वर्षी लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला तसेच मागील वर्षी पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली. तसेच पाण्याची बचतही झाल्याचे समाधान बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आले.

 

मंत्री विखे पाटील यांनी आगामी काळातील पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करताना, लाभक्षेत्राला चार आवर्तनाचा लाभ कसा मिळेल याचे नियोजन करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या रब्बी हंगाम सुरु असून, या हंगामाकरीता दोन आवर्तनं आणि उन्हाळी हंगामाकरीता दोन स्वतंत्र आवर्तनं घेण्यास बैठकीत अनुमती देण्यात आली. रब्बी हंगामातील पहिलं आवर्तन आज दिनांक 21 डिसेंबर पासूनच सुरु करण्याचे निर्देशही विखे यांनी दिले.

 

उन्हाळा हंगामातही दोन आवर्तनं करण्याचे नियोजन विभागाने करावे असे सुचित करुन आवर्तनातून होणाऱ्या पाणी बचतीमधून आवश्यकतेनुसार पाचवे आवर्तन करण्याच्या सुचनाही मंत्री महोदयांनी दिल्या. कालव्यांच्या आवर्तनाचे नियोजन करतानाच मुख्य कालव्यांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्याने प्रस्ताव तयार करण्याच्या त्यांनी यावेळी दिल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!