• लम्पी चर्मरोग नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन सुविधेमुळे पशुपालकांना दिलासा मिळणार — विखे-पाटील 

पशुसहाय्यता ॲप्लीकेशन आणि ऑनलाईन सुविधेचे पशुसंवर्धन मंत्री विखे यांच्या हस्ते झाले उदघाटन

प्रतिनिधी —

लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी निर्माण करण्यात आलेल्या ऑनलाईन सुविधेमुळे राज्यातील पशुपालकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पशुसहाय्यता ॲप्लीकेशन आणि ऑनलाईन सुविधेचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. हे शेतकऱ्याचे आणि सर्व सामान्यांचे सरकार आहे, त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवाला जलद गतीने आणि विनात्रास नुकसान भरपाईचा अर्ज आणि भरपाईची रक्कम मिळावी हाच यामागचा उद्देश असल्याचे सूतोवाच विखे -पाटील यांनी केले.

महाराष्ट्रासह देशभरातील राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश आदी राज्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन बळी पडून शेतकरी बांधवांचे नुकसान झाले. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने रोगाच्या सुरुवातीच्या काळातच १०० टक्के लसीकरणाचा निर्णय घेतल्याने पशुधन आजारी पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी होऊन मृत्यु दरातही घट झाली. एकंदर लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र राज्याला यश मिळाले असून विविध प्रभावी उपाययोजनासह लसीकरणामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. या पशुसहाय्यता ॲप्लीकेशन आणि ऑनलाईन सुविधेच्या उदघाटन सोहळ्यास पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते.

राज्यात ३ लाख ९७ हजार २४९ एवढे पशुधन आजारी पडले होते, पैकी योग्य उपचारामुळे ३ लाख २० हजार ६७९ पशुधन बरे झाले. मात्र तरीही ज्या ठिकाणी पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत, तेथील माहिती घेऊन, त्वरित पंचनामे करण्यात आलेले आहेत. तसेच २८ हजार २२७ मृत्यू झालेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत सुमारे ४१ कोटी ४७ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची रक्कम पशुधन पालकांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अद्यापही हि प्रक्रिया नियमित राबविली जात असून नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्याच्या कालावधीत थेट पशु पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. मात्र प्रक्रियेमधील विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता शेतकरी त्याचे मोबाईल फोनवरुन पशुसहाय्यता या ॲप्लीकेशनचा वापर करुन अर्ज करु शकतो तसेच केलेल्या अर्जाच्या मंजुरी प्रक्रियेची माहिती देखील त्याला समजु शकते. त्यामुळे नुकसान भरपाई करिता शेतकऱ्यांची सर्वसाधारणपणे होणारी ससेहोलपट होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.तरी नुकसानपाई करीता पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!