संकेत नवलेच्या मारेकऱ्यांना शोधा

नवलेवाडी ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

प्रतिनिधी —

संकेत नवले या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यांमध्ये टाकण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण संगमनेर शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र अद्याप पर्यंत तपासात प्रगती दिसून येत नाही. संकेत नवले याच्या खुना मागचे कारण काय ? त्याचे मारे करी कोण ? हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे.

संकेत नवले हा मूळचा अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रहिवासी आहे. नवलेवाडी च्या सर्व ग्रामस्थांनी सरपंचांच्या वतीने संकेत च्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधा अशी मागणी नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात नवलेवाडी चे सरपंच प्राध्यापक विकास भिकाजी नवले यांनी म्हटले आहे की,

संकेत सुरेश नवले या तरुणाच्या खुनाच्या घटनेने नवलेवाडी ,(ता. अकोले, जि. अहमदनगर) ग्रामस्थ अत्यंत दुःखी आहेत. संकेत हा नवोदयला शिकलेला गुणवान विद्यार्थी होता. त्याचे वडिल हे नामवंत शिक्षक आहेत. हे शेतकरी कुटुंब असून या कुटुंबातील जवान देशासाठी शहीद झाला आहे.

अशा सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाचा शिक्षण चालू असताना ८ डिसेंबर २०२२ च्या रात्री संगमनेर येथे खून झाल्याने सर्व गाव हादरून गेले आहे.

महाविद्यालयातील मुलांच्या मानसिकतेवरही या घटनेचा मोठा परिणाम झाला आहे. याबाबत ग्रामस्थांच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत. या घटनेचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करत आहोत. घटना घडून पाच दिवस उलटल्यानंतरही मारेकरी पोलिसांना सापडलेले नाहीत हे दुर्दैवी आहे.

नवलेवाडी हे क्रांतिकारकांचे गाव आहे. या गावातील मधुकरराव नवले, कॉ.अजित नवले हे  राज्यस्तरावर शेतकऱ्यांचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासह अनेकांनी या घटनेचा उलगडा करण्याची मागणी पोलिसांकडे केलेली आहे. मात्र पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

घटनेमुळे आम्ही सर्व गावकरी अस्वस्थ आहोत. संकेत याच्या मारेकऱ्यांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आहे.

सर्व गावकऱ्यांच्या वतीने ही मागणी मी आपणपर्यंत पोहोचवत आहे. संकेतचे मारेकरी तात्काळ शोधण्यासाठी पोलिसांनी जे काही प्रयत्न करणे आवश्यक आहेत ते करावेत व न्याय द्यावा. अन्यथा या क्रांतिकारी गावाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. एक आठवड्यात तपास न झाल्यास ग्रामसभा घेऊन आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत ही बाब या पत्राद्वारे आपल्या निदर्शनास आणत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!