‘ब्युटी अँड यू’ स्पर्धेची मानकरी ठरली दिव्या मालपाणी यांची “स्किनव्हेस्ट” कंपनी !

प्रतिनिधी —

भारतातील पहिलीच ‘ब्युटी अँड यू’ ही स्पर्धा जिंकून आमच्या स्किनव्हेस्टच्या उत्पादनांनी मोठी झेप घेतली आहे. उत्कृष्टतेच्या निकषांवर सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या परीक्षण समितीने आमची केलेली निवड खूप अभिमानास्पद आहे. पुरस्काराचा मनस्वी आनंद तर आहेच आणि भविष्यातील जबाबदारी वाढल्याची जाणीव सुद्धा झाली आहे. केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत ‘स्किनव्हेस्ट’चा वापर विश्वासाने करुन त्याला इतक्या उंचावर नेणार्‍या सुजाण ग्राहकांना हा पुरस्कार समर्पित आहे. भविष्यात ग्लोबल ब्युटी इंडस्ट्रीमध्ये भारताचा ठसा उमटविण्याची तीव्र इच्छा असल्याची भावना स्किनव्हेस्टच्या संस्थापक व सीईओ दिव्या मालपाणी यांनी व्यक्त केल्या.

सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील जगप्रसिध्द कंपनी ‘एस्टी लॉडर’ आणि भारतातील सर्वात मोठी ब्युटी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘नायका’ यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या राष्ट्रीय ‘ब्युटी अँड यु’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून संगमनेरच्या दिव्या मालपाणी या नवउद्योजिकेने इतिहास घडवला आहे. दिव्याने अतिशय तरुण वयात जेमतेम काही महिन्यांपूर्वीच स्किनव्हेस्टची सौंदर्य प्रसाधने बाजारात उपलब्ध करून दिली होती. या स्पर्धेत त्यांच्या कंपनीची उत्पादने सर्वोत्कृष्ट ठरल्याने त्यांना विजेतेपदासह तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले आहे. सिनेअभिनेत्री कतरीना कैफ हिच्या हस्ते शानदार समारंभात त्याचे वितरण करण्यात आले होते.

इतक्या मोठ्या रकमेचे पारितोषिक जिंकणारी दिव्या ही पहिलीच युवा उद्योजिका ठरली आहे. बाजारपेठेत अलीकडेच दाखल झालेल्या नवीन उत्पादनांसाठी असलेल्या ‘ग्रो’ या गटात तिचे स्किनवेस्ट सर्वोत्कृष्ट ठरले. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यास नायकाच्या संस्थापिका व सीईओ फाल्गुनी नायर, ई-कॉमर्स विभागाचे सीईओ अंचीत नायर, सब्यसाची मुखर्जी, निकोला किलनर, समर्थ बेदी, दीपिका मुत्याल, अनैता श्रॉफ, एस्टी लॉडर्सच्या उपाध्यक्षा शनाया रंधावा, जनरल मॅनेजर रोहन वझीरल्ली, प्राची पवार अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती.

देशभरातील तब्बल तिनशेहून अधिक स्पर्धकांमधून दिव्या मालपाणी यांच्या स्किनव्हेस्टची निवड झाली. स्किनवेस्ट उत्पादनांची गुणवत्ता, परीक्षकांच्या समोर केलेले प्रभावी सादरीकरण आणि त्यांच्या प्रश्नांना दिलेली अचूक उत्तरे दिव्या मालपाणीला विजयश्री देवून गेली. ‘आम्ही जिंकलो; त्या क्षणाचे वर्णन करण्यासाठी खरोखरीच शब्दच नाहीत. भविष्यात अजूनही बरीच पारितोषिकं मिळवू. येत्या जानेवारी पासून सहा नवीन उत्पादने बाजारात आणायची आहेत.

मार्केट सर्व्हे करून, ग्राहकांच्या गरजेनुसार ही उत्पादने असतील. मोठ्या शहरांमध्ये पॉप-अप स्टोअर्स आणि ‘नायका’च्या स्टोअर्समध्ये विक्री सुरु करण्याची योजना आहे. स्किनव्हेस्टची मार्केटिंग मॅनेजर जून बिस्वास व अवंतिका खैरनार, आमच्या सर्व उत्पादनांचे सुंदर छायाचित्रण आणि व्हिडीओग्राफी करणारे अविनाश कोटेकर आणि सर्व ‘टीम स्किनवेस्ट’ समर्पित भावनेने काम करीत असल्याने हे यश मिळाले. आमची भविष्यातील देखील सर्वच उत्पादने स्त्री-पुरुष सर्वांसाठीच खूप उपयुक्त आणि प्रभावी असतील त्यामुळे जागतिक क्षितीजावर स्किनव्हेस्ट यशस्वीपणे झळकेल असा विश्‍वास यावेळी बोलतांना दिव्या मालपाणी यांनी व्यक्त केला. या पुरस्काराबद्दल तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!