आर्थिक नियोजन आणि ध्येय साध्य करण्यासाठी सल्लागार महत्त्वाचा – सुनील कडलग

चला अर्थसाक्षर होऊयात ‘ सह्याद्री ऍग्रोव्हेटचा अभिनव उपक्रम !

प्रतिनिधी –

महाभारताचे युद्ध पांडवांनी जिंकले याचे कारण त्यांचा सल्लागार कृष्ण होता. आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी आणि आपले ध्येय प्राप्त करण्याकरता तज्ज्ञ सल्लागार असेल तरच ते ध्येय साध्य होईल असे प्रतिपादन आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले .

येथील औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री ऍग्रोव्हेेटतर्फे कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन मेळावा म्हणून ‘ चला अर्थसाक्षर होऊयात ‘ हा उपक्रम राबवण्यात आला. त्याप्रसंगी कडलग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे तर व्यासपीठावर धनश्री हासे , टीव्ही अभिनेते सुरेश डोंगरे आदी उपस्थित होते.

कडलग पुढे म्हणाले की, जीवनामध्ये सल्लागाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या जीवनातील मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न, आपली सेवानिवृत्ती आणि जीवनामधील अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे, आपत्कालीन निधीचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींसाठी आर्थिक साक्षरता आवश्यक आहे. दुर्दैवाने भारतामध्ये आर्थिक साक्षरता समाजामध्ये रुजलेली नाही. खरंतर भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये इयत्ता पहिली पासून आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये अर्थ साक्षरता रुजली तर खऱ्या अर्थाने देश आर्थिक महासत्ता होईल.

आर्थिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणूक, आपत्कालीन निधीसाठी लिक्विड फंड गुंतवणूक, संरक्षणासाठी जीवन विमा, आरोग्य विषयक आपत्तीसाठी पुरेसा आरोग्य विमा , वैयक्तिक अपघात विमा आदी गोष्टी प्रत्येक व्यक्तीने काळजीपूर्वक अंगीकारणे आवश्यक आहे. अन्यथा कुटुंब उघड्यावर पडू शकते म्हणून ग्राहकांनी अर्थसाक्षर होणे ही काळाची गरज आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची मूल्ये मजबूत आहेत . अर्थव्यवस्था स्थिर गतीने वाटचाल करीत आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था गती घेईल असा अंदाज मुडिज या पतमानांकन संस्थेने वर्तवला आहे. अर्थव्यवस्थेची स्थिर वाटचाल, आर्थिक सुधारणांना मिळत असलेली गती, खाजगी क्षेत्राकडून वाढत असलेली गुंतवणूक, आर्थिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी सरकारच्या डोक्यावरील कमी होत असलेला कर्जाचा बोजा यामुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीपथाकडे जाणार आहे या पार्श्वभूमीकडे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करतील असेही कडलग म्हणाले.

या पार्श्वभूमीवर सह्याद्री ॲग्रोव्हेटने आयोजित केलेला चला अर्थ साक्षर होऊयात हा मार्गदर्शन मेळावा समाजाला दिशादर्शक ठरेल असेही कडलग म्हणाले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात नितीन हासे म्हणाले की जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सध्या असंख्य आपत्ती आहेत. लंपी आजारामुळे जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. गाय मृत्युमुखी पडल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी सह्याद्री ॲग्रोव्हेटतर्फे मदत दिली जाते.

गरजू मुलींच्या शिक्षणासाठीही दत्तक पालक योजना राबविण्यात आलेली आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून हे उपक्रम राबवण्यात येतात. सह्याद्री ॲग्रोव्हेटचा प्रत्येक घटक अर्थसाक्षर व्हावा व त्याच्या जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा म्हणूनच ‘चला अर्थ साक्षर होऊयात’ हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे.

याप्रसंगी आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग व विनोदी टीव्ही अभिनेते सुरेश डोंगरे यांचा सत्कार नितीन हासे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिती सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन धनश्री हासे यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!