‘सबका साथ,सबका विकास’ मुळे मालपाणी समूह प्रगतीपथावर – गिरिश मालपाणी
७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
संगमनेर दि. 27 — प्रतिनिधी
‘मालपाणी उद्योग समुहातील कामगार सहकारी बंधू भगिनी, स्टाफ सहकारी, पुरवठादार अशा सर्वच घटकांच्या हिताची जपणूक करण्याचे धोरण राबविले जाते. अशा प्रकारे ‘सबका साथ,सबका विकास’ भुमिकेमुळे मालपाणी समूह सातत्याने प्रगतीपथावर आहे. हे सर्वांच्या सांघिक प्रयत्नांचे यश आहे. अहोरात्र अत्यंत दक्ष असलेल्या सुरक्षा विभागाचे त्यातील योगदान अनमोल आहे.’ असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरिश मालपाणी यांनी येथे केले.

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मालपाणी इस्टेटच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापक रमेश घोलप, रवींद्र कानडे, देवदत्त सोमवंशी, मनोज हासे, प्रदीप कानवडे, कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड माधवराव नेहे आदी मान्यवर उपस्थित होते.

मालपाणी यांनी औद्योगिक प्रगतीच्या माध्यमातून मालपाणी उद्योग करीत असलेल्या देशसेवेचा अभिमान असल्याचे आवर्जून सांगितले. ‘आपला समूह सर्वाधिक जीएसटी आणि उत्पन्न कर भरतो आणि प्रत्येक वर्षी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून समूहाचा सन्मान केला जातो ही गोष्ट अभिमानाची आहे’ असे ते म्हणाले .

‘सुरक्षा विभागातील अनेक जवानांनी वर्षभरात केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा केलेला सन्मान त्यांची उमेद वाढविणारा ठरतो. सुरक्षा विभागातील सर्व जवान नेहमी दक्ष असतात म्हणूनच अनुचित प्रकार घडत नाहीत आणि घडलाच तर तातडीने लक्षात येतो. सुरक्षा विभागाचे प्रमुख भारत मोरे आणि त्यांची सर्व टीमच कर्तव्याच्या बाबतीत दक्ष आहे. उद्योगांच्या प्रगतीत सुरक्षा विभागाचा सिंहाचा वाटा आहे याची जाणीव सर्व औद्योगिक विश्वाला आहे.’ असे मालपाणी पुढे म्हणाले. त्यांनी आपल्या अभ्यास पूर्ण भाषणात भगवद्गीता, क्रिकेट अशा सार्क क्षेत्रातील उदाहरणे दाखले देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. निद्रा, आहार, आणि विहार याविषयी भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला समतोल राखला तर प्रत्येक जण निरोगी तंदुरुस्त आणि उत्साही राहून अथक परिश्रम करून प्रगती साधू शकतो असा मंत्र त्यांनी शेवटी दिला. यावेळी श्री घोलप, सोमवंशी, नेहे यांचीही समयोचित भाषणे झाली.

मालपाणी यांच्या हस्ते ध्वजवंदन आणि ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षा विभागाच्या घोष पथकाने शिस्तबद्ध संचलन सादर करून तिरंग्यास मानवंदना दिली. विविध घटनांमध्ये प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडणारे सुरक्षा विभागातील जवान चैतन्य भोकनळ, धनंजय आव्हाड, जयप्रकाश कातोरे, सागर कानवडे, दत्तू काळे यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शिस्तबद्ध परेडचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल शरद कानवडे यांचा सत्कार करण्यात आला. तीन वर्षांपासून सुरक्षा विभागाला खंबीर नेतृत्व देणारे विभाग प्रमुख भारत मोरे यांचा विशेष सत्कार गिरिश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन करणारे मुरारी देशपांडे यांनी देशभक्तीपर आवेशपूर्ण कविता सादर केली तर आभार मेजर बाळकृष्ण अरगडे यांनी केले. कार्यक्रमासाठी मालपाणी उद्योग समुहातील कामगार बंधू भगिनी स्टाफ सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालपाणी इस्टेट च्या आवारात छान सजावट करण्यात आली होती.

