गांजा तस्करीची “राजधानी संगमनेर” !
अवैध धंद्यात संगमनेर नगर जिल्ह्यात टॉप वर !
प्रतिनिधी —
बाहेरील राज्यातून येणाऱ्या गांजा सह महाराष्ट्रातील गांजा तस्करीचे महत्त्वाचे केंद्र हे संगमनेर शहर असून आता “गांजा तस्करीची राजधानी” म्हणून संगमनेर नावा रुपाला येत आहे.

अनेक वेळा झालेल्या कारवायांमध्ये गांजा तस्करीत आरोपी हे संगमनेरचे आणि प्रमुख सूत्रधार असल्याचे आढळून आलेले आहेत. अवैध धंद्यांच्या बाबतीत संगमनेर नगर जिल्ह्यात टॉपवर तर आहेच, मात्र आता गांजा तस्करीत संगमनेर ही गांजा तस्करीची राजधानी होऊ पाहत आहे.

पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील समनापुर शिवारात सापळा रचून सुमारे १६ लाख रुपये किमतीच्या गांजा सह २४ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. यामध्ये दोन आरोपी सापडले आहेत. तस्करांच्या टोळीचा शोध अजून लागायचा आहे. पोलिसांनी टोळी शोधली तर ती सापडेल. आता हे सर्व पोलिसांच्या कृतीवर अवलंबून आहे. तर हा पकडलेला गांजा संगमनेरसह पुणे जिल्ह्यात वितरित होणार होता. अशी माहिती समोर आली आहे.

नगर जिल्ह्यात आणि राज्यात किंवा राज्याबाहेर कुठेही गांजाची मोठी कारवाई झाली तर त्याचे कनेक्शन संगमनेरशी असतेच असा आजवरचा पोलिसांचा अनुभव आहे.

या आधी सुद्धा ठाणे जिल्ह्यातून आलेल्या पोलीस पथकाने संगमनेर मध्ये गांजा तस्करांना पकडले होते. नगर जिल्ह्यात सुद्धा यापूर्वी गांजा तस्करी वरून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. त्याचे कनेक्शन सुद्धा संगमनेरच होते. तेलंगणा पोलिसांनी २ कोटी रुपयांचा ९०० किलो गांजा नुकताच पकडला. त्याचे प्रमुख सूत्रधार संगमनेरचेच आहेत.

हे सर्व काही घडत आहे ते संगमनेरच्या भोवती. त्यामुळे ‘गांजा तस्करीची राजधानी संगमनेर, म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
गांजा तस्करीत संगमनेर सध्या महाराष्ट्रात नंबर वन असले तरी संगमनेर शहरात विविध प्रकारचे अवैध धंदे राजरोस पणे चालू असतात. यामध्ये गांजा तस्करी प्रामुख्याने असली तरी मटका हा संगमनेरचा पायाभूत अवैध धंदा आहे.

नगर जिल्ह्यात मटक्याचे मुख्य केंद्र संगमनेरच आहे. येथील मटका अड्डे कधीच बंद झालेले नाहीत. तसेच गुटखा, जुगार अड्डे, वाळू तस्करी, गौण खनिज तस्करी यात देखील नगर जिल्ह्यात संगमनेर टॉप वर असते. एकंदरीत पाहता अवैध धंद्यांचे केंद्र संगमनेर असल्याचे नेहमीच आढळून आले आहे.
येथे बदलून आलेले अधिकारी आणि बदलून गेलेले अधिकारी हे फक्त लुटूपुटूच्या कारवाया करताना दिसतात. विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई केली तरच मोठी कारवाई संगमनेरात होते.

मात्र या गांजा तस्करी मधले किंवा मटक्यासारख्या अवैध धंद्यां मधले सर्व ‘किंग’ आणि ‘सूत्रधार’ नेहमीच मोकळे असतात. संगमनेर मध्ये असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधीच मोठ्या कारवाया केल्याचे दिसून आलेले नाही. हे धंदे राजरोसपणे सुरू असतात. आजकालची कारवाई म्हणजे ‘केला इशारा जाता – जाता’ असल्याची चर्चा आहे.
छोटी मोठी कारवाई करून पंटर लोकांना पकडून कारवाई केल्याचा भास निर्माण केला जातो आणि त्यानंतर बाकी सर्व आलबेल सुरू असते.

राजूर, अकोले, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय या ठिकाणी फक्त नावालाच आहे.
मोटर सायकल चोरी, वीज पंप चोरी, हातभट्टीची दारू अशा छोट्या-मोठ्या, किरकोळ कारवायांचे सापळे दाखवून कारवाई केल्याचे पोलिसांकडून भासविले जाते. मात्र बडी मंडळी निवांतच असते.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संगमनेर शहरात सुरू असलेले अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्या या कधीच बंद झालेल्या नाहीत. गोवंश हत्या आणि त्यातून मिळणारा अमाप पैसा यामुळे संगमनेरचे पोलीस खाते बदनाम झालेले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील बदनाम झाले आहेत. संगमनेरच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील या कत्तलखान्यातील गोहत्यांवरून पोलीस प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली जाते. त्यांच्यावर बहिष्कार घातला जातो. यातूनच संगमनेरच्या पोलिसांची प्रतिमा समजून येते.

या ठिकाणी येणारे वरिष्ठ अधिकारी सुद्धा काही दिवस कारवाईचा ‘शो’ करतात नंतर परिस्थिती मात्र जैसे थे असल्याचे चित्र असते. आजही संगमनेर शहरात सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. कारवाई मात्र कुठलीही होत नाही.

