दिवाळी पाडव्याच्या दिवशी पकडले एक हजार किलो गोवंश मांस !
तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी —
दिवाळी पाडव्याच्या गडबडीची संधी साधत गोवंश तस्करी करताना संगमनेर पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १ हजार किलो गोवंश मांसासह ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संगमनेर तालुक्यातील समनापुर शिवारात गोवंश मांस घेऊन मुंबईकडे जाणारा हा टेम्पो पोलिसांनी पाडव्याच्या पहाटे पकडला. या टेम्पोमध्ये एक हजार किलो गोवंश मांस पोलिसांना आढळून आले.

शाबान अली हुकूम अली शहा (वय ३८ रा. गोवंडी, मुंबई) आणि तोहिद दोस्त मोहम्मद पठाण (वय ३० रा. आळे, ता. जुन्नर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

दीपावली पाडव्याच्या दिवशी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एका टेम्पोमधून गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने शहरालगतच्या समनापुर बायपासवर सापळा लावला. या सापळ्यात संशयास्पद टेम्पो अडकल्यानंतर त्याची तपासणी केली असता, त्यात सुमारे १ हजार किलो गोमांस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी टेम्पो आणि मांस ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोघा जणांवर कारवाई केली आहे.

सदर गोवंश माणसे मुंबई येथे नेले जात होते. एक तर ते संगमनेर तालुक्यातील कुरण येथून आणले असावे किंवा श्रीरामपूर तालुक्यातील हसनापूर येथून आणले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

एकंदरीत पाहता संगमनेर काय अन् श्रीरामपूर काय, नगर जिल्ह्यातील गोवंश हत्या आणि गोवंशमांस तस्करी थांबलेली नाही.
पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नसल्याने नगर जिल्ह्याच्या महत्त्वाच्या केंद्रांमधून गोवंश हत्या, अवैध कत्तलखाने आणि गोवंश मांस तस्करी सातत्याने सुरूच असल्याचे आढळून आले आहे.

पोलीस कर्मचारी एकनाथ खाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात शाबान अली हुकूम अली शहा (वय ३८ रा. गोवंडी, मुंबई) आणि तोहिद दोस्त मोहम्मद पठाण (वय ३० रा. आळे, ता. जुन्नर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


