बाहेरून येणाऱ्या जनावरांची नाक्यांवर होणार तपासणी !
लम्पी रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून कार्यवाहीचे संगमनेर तहसीलदारांचे निर्देश
प्रतिनिधी —
लम्पी आजाराने बाधित असणारे जनावरे तालुक्यांमध्ये प्रवेश करू नयेत म्हणून तपासणी नाके उभे करण्यात येणार आहेत. तसेच ऊस तोडी साठी बाहेरून आलेले व आजाराने ग्रस्त असणाऱ्या जनावरांच्या उपचाराची जबाबदारी साखर कारखान्यांची असून साखर कारखान्यांनी आजारग्रस्त जनावरांना शक्यतो ऊस वाहतुकीसाठी वापरू नये. अशा सूचना संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिल्या आहेत.

संगमनेर तालुक्यात लम्पी आजाराने अद्याप पर्यंत ६५ जनावरांचा मृत्यू झाला असून ४२ जनावरांसाठी नुकसान भरपाई मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तालुक्यात १ लाख ८७ हजार २०४ जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले असून तालुक्यातील १ हजार २०७ जनावरे आजाराने बाधित झाल्याचे आढळून आले. त्यापैकी ७२४ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर उर्वरित ४७७ जनावरांवर १२४ गावांमध्ये उपचार सुरू आहेत.

उपचारा दरम्यान प्रतिसाद न देणाऱ्या गंभीर आजारी असणाऱ्या जनावरांच्या विविध चाचण्या विभागामार्फत करण्यात येत असून चाचणीच्या निष्कर्षानुसार तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार पद्धतीमध्ये बदल करण्यात येत आहेत.

पशुधनाचे लसीकरण, बाधित जनावरांवर उपचार, त्यासाठी आवश्यक औषधे घरपोच सेवा मोफत देण्याची कारवाई विभागा मार्फत करण्यात येत असल्याची माहिती संगमनेर तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

लम्पी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुका स्तरीय समितीची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीच्या आढाव्यामध्ये वरील माहिती सादर करण्यात आलेली आहे.

तसेच साखर कारखान्यांवर ऊसतोडी साठी आलेल्या कामगारांच्या गुरांची, पशुधनाची तपासणी करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सूचनेनुसार त्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र, कानाला बिल्ले असलेल्या व आरोग्य प्रमाणपत्र असलेल्या जनावरांना प्रवेश देण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

सागर कारखान्याकडील पशुधनाला लम्पी आजाराची बाधा झाल्यास बाधित जनावरांना उपचार करण्याची जबाबदारी संबंधित कारखान्याची असल्याचे कारखान्यांना सूचित करण्यात आले आहे.

लसीकरण न झालेल्या पशुधनाच्या सहाय्याने कोणीही ऊस वाहतूक करू नये. तसेच कारखाना प्रशासन त्यांचा ऊस घेणार नाही असे आदेश शेतकी अधिकारी यांना देऊन याकरता साखर कारखान्याची एक विशेष टीम नेमणूक करावी व पशुधन संवर्धन विभागाच्या सहकार्याने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत.

तालुक्यामध्ये येणाऱ्या पशुधनावर नियंत्रणासाठी कारखाना प्रशासन, पोलीस विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह तपासणी नाके यांनी करावयाच्या कार्यवाही संदर्भात सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्याच्या सीमावर अशा प्रकारे तपासणी नाके कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गटविकास अधिकारी अमोल नागणे, डॉ. जे.के. थिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जोंधळे, संगमनेर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि युटेक शुगर लिमिटेड कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. एन. पवार उपस्थित होते

