अहमदनगर जिल्ह्यात “यलो अलर्ट” 

अतिवृष्टी मुसळधार पावसाची शक्यता

प्रतिनिधी —

राज्यातसातत्याने पाऊस सुरू असल्याने सर्वत्र ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने अहमदनगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनानुसार अहमदनगर जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह वीज पडणे व मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी यलो आर्ट जारी करण्यात आलेला आहे.

अहमदनगर पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरू असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी तशा आशयाचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखलभागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपासून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

नदी, अथवा ओढे, नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट व मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आसरे घेऊ नयेत. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

धरण क्षेत्रांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री) व ०२४१- २३२३८४ व २३५६९४० या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवरा, गोदावरी, भीमा घो, सिना आणि मुळा या नद्यांमधून सध्या नेहमीप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रवरा नदीचा ओझर बंधाऱ्यावरचा विसर्ग ५ हजार ९३ क्युसेक निसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वर बंधारा १७ हजार ५२५, जायकवाडी धरण ४७ हजार १०७, दौंड पूल २८ हजार, घोड नदी ६ हजार, सीना २ हजार ६०६ आणि मुळा धरणातून १० हजार क्युसेकने सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!