१०० लाख कोटींचा होईल म्युच्युअल फंड उद्योग !
भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ती निर्माण करतील – सुनील कडलग
प्रतिनिधी —
म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग १०० लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ती निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला.

घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दिपावली निमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंगशेठ वाकळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदिप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटकाने अर्थ साक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ति निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.

आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात कडलग पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्याने पैशांचे मूल्य कमी होत आहे. त्या तुलनेत संपत्ति निर्माण करण्यासाठी बचत व गुंतवणुकीतील फरक समजावून घेणे आवश्यक आहे. बँक मुदत ठेवीला त्यांनी धोकादायक सुरक्षित असे संबोधले.

बँक मुदत ठेवी, पीपीएफ, रियल इस्टेट , सोने , शेअर्स, म्युच्युअल फंडस् आदी गुंतवणूक पर्यायांची तुलना व महत्व, त्यांच्या मर्यादा तसेच गुंतविलेल्या पैशांचा योग्य परतावा मिळण्यासाठी टाळावयाच्या चुका यासाठी कडलग यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.


विमा संरक्षणासाठी टर्म इन्शुरन्स, आपत्कालीन वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीसाठी वैद्यकिय विमा, वैयक्तिक अपघात विमा कवच , आपत्कालिन निधीची तरतूद आणि दीर्घकालीन संपत्ति निर्माणसाठी सल्लागाराच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक असे पाच मूलभूत मंत्र त्यांनी उपस्थितांना सांगितले. जगाचे गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांचे विचारही त्यांनी स्पष्ट केले.

सद्यस्थितीत सप्टेंबर २०२२ अखेर ३९.८७ लाख कोटींच्या संपत्तीचे व्यवस्थापन करत असलेला म्युच्युअल फंड उद्योग हा येत्या चार – पाच वर्षांत १०० लाख कोटींचा होईल व जगात पाचव्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था ही २०२९ पर्यंत तिसऱ्या क्रमांकाची असेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्रगल्भ लोकशाही, स्थैर्य व लोकसंख्येच्या तुलनेत ६५ टक्के असलेली युवकांची संख्या ही भारताची बलस्थाने असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बँकांमध्ये आजही १६० लाख कोटींच्या बचत ठेवी आहेत. भविष्यात त्या म्युच्युअल फंडात वळतील असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी संदिप फटांगरे, सुभाष राहणे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन फटांगरे यांनी केले.
