संगमनेरात पोलिसाच्या दोन दुचाकी जाळल्या !
पोलीस नेमके करतात काय ?
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहने जाळण्याचे प्रकार वाढीस लागले असून दस्तूर खुद्द पोलीस देखील यातून सुटले नसल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसाच्या दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार संगमनेर शहरालगत घडला असून शहर पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.

यापूर्वीही संगमनेर शहरात तीन – चार ठिकाणी वाहने जाळण्याचे प्रकार झाले. या जाळपोळीमध्ये अद्याप पर्यंत पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. आता पोलिसाचीच वाहने जाळल्याने संगमनेर शहर पोलीस तपासात काय दिवे लावतात हे आता दिसून येईल.

सध्या पोलीस मुख्यालय ठाणे ग्रामीण येथे पोलीस नाईक या पदावर नेमणुकीस असलेले राजेश सावित्रा माळी (रा. ढोलेवाडी, माधवनगर, ता. संगमनेर) यांच्या दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राजेश माळी यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माळी हे सध्या भातसा धरण या ठिकाणी गार्ड ड्युटी वर तैनात आहेत. त्यांचे कुटुंबीय हे त्यांच्या मूळ गावी ढोलेवाडी माधवनगर संगमनेर येथे राहत आहेत. माळी हे स्वतः येऊन जाऊन आपले काम करत असतात.

संगमनेर पोलीस नेमके करतात काय ?
अवैध धंद्याने संगमनेर शहराची अब्रू वेशीवर टांगलेली असतानाच दुचाकी चोरीच्या घटना देखील वारंवार घडत आहेतच. याआधी देखील शहरातील तीन चार ठिकाणी दुचाकी जाळण्याचे प्रकार झाले. यात रिक्षा आणि चार चाकी गाडी जाळण्याचा देखील प्रकार झालेला आहे. तसेच शहरातील गांजा, मटका अड्डे, गुटखा, वाळू तस्करी, गोवंश मांस तस्करी नेहमीच चव्हाट्यावर येत असते. त्यामुळे संगमनेर शहरातील पोलीस नेमके करतात काय ? आणि वरिष्ठ अधिकारी कोणत्या पद्धतीने त्यांच्या कामावर लक्ष ठेवतात ? हा चर्चेचा विषय झाला आहे.

रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दोन्ही मोटर सायकल्स घरासमोर उभ्या करून घरातील सर्व लोक झोपी गेले असता पहाटे दोन वाजण्याचा सुमारास त्यांच्या मुलीला जाग आल्याने तिला घरासमोर लावलेल्या मोटारसायकली जळत असल्याच्या दिसल्या. तेव्हा माळी यांनी फोन करून पोलीस व अग्निशामक यांना बोलावले व जळत असलेल्या दुचाकी विझविल्या.

यामध्ये हिरव्या रंगाची होंडा कंपनीची ॲक्टिवा क्रमांक एमएच १७ सीएच ६७६५ आणि लाल रंगाची हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच १७ एएक्स ६९०४ अशा दोन्ही गाड्या कोणीतरी अज्ञात इसमाने जाळून टाकल्या आहेत. माळी यांनी फिर्याद दिल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महाले हे करत आहेत.

