चार भावंडांच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल ; एकाला अटक
तुटलेल्या वीज वाहक तारेचा शॉक लागून चार बालकांचा मृत्यू झाला होता
प्रतिनिधी —
तळ्यामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या चार भावंडांचा तुटलेल्या वीज वाहक तारेचा शॉक बसून मृत्यू झाला होता. वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरत होती. आज मयतांच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्य खंदरमाळवाडी गावच्या वांदरकडा येथील चार भावंडांचा शनिवारी सकाळी एका तळ्यात आंघोळीसाठी गेले असताना तुटलेल्या विजवाहक तारेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संदर्भाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांच्याबाबत संताप व्यक्त केला जात होता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती.

अनिकेत अरुण बर्डे, ओमकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे (सर्व रा. वांदरकडा, खंदरमाळवाडी, ता. संगमनेर जि. अहमदनगर) या चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

दरम्यान राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे भेट देऊन मयत बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते व यासंबंधी दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले होते.

आज घारगाव पोलीस ठाण्यात अरुण हौशीराम बर्डे (रा. वांदरकडा, खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिल्याने मृत्यूस कारणीभूत असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भालेराव पूर्ण नाव गाव माहित नाही. जालिंदर लेंडे पूर्ण नाव माहित नाही. साहेबराव शिवाजी लेंडे (रा. खंदरमाळ) अशी आरोपींची नावे असून यातील भालेराव यास अटक केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वरील ठिकाणी विद्युत पोल वरील वीज वाहक तार तुटलेली असल्याने यातील फिर्यादी यानी डीपी मधुन खटका बंद करून विज पुरवठा बंद केलाहोता. वीज वितरण कंपनीत मध्ये प्रत्यक्ष जाऊन वीज वाहकतार तुटलेली असल्याचे सागितले होते. परंतु सदर गावचे वायमन आरोपी भालेराव यांनी तार दुरूस्त केली नाही. अगर काही एक कार्यवाही केली नाही.

तसेच आरोपी जालिंदर लेंडे व साहेबराव लेंडे यांनी पोलवरील तार तुटुन पडलेली असल्याचे व त्या मधुन विद्युत पुरवाठा चालू केल्यास एखाद्याचा मृत्यु होऊ शकतो हे माहीत असतांना देखील त्यांनी डी.पी.वरील लाईट खटका चालू केल्याने तुटलेल्या तारे मधून विद्युत प्रवाह चालू झाला.

त्यामुळे यातील मयत हे पाण्यामध्ये अंघोळ करण्यासाठी व खेळण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करत आहेत.

