काँग्रेसच्या पुढार्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला बदडले !
सरपंच आणि शेतकी संघाच्या संचालकावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी —
आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का देतोस असे म्हणत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका भाजपच्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या पुढार्यांनी जबर मारहाण केली.

संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तळेगाव दिघेच्या सरपंचासह संगमनेर तालुका शेतकी संघाच्या संचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
बाबासाहेब प्रभाकर कांदळकर, सचिन रामनाथ दिघे आणि मतीन चांदभाई शेख सर्व (रा.तळेगाव दिघे, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

भाजप कार्यकर्ते रामदास कारभारी दिघे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादित त्यांनी म्हटले आहे की, वरील तिघांनी मी सायंकाळी घरी जात असताना संगमनेर साखर कारखान्याच्या गट ऑफिस समोर मला अडवून आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतो का, तू जास्त शहाणा झाला आहेस का, या गावचा बाप झाला आहेस का असे म्हणत व शिवीगाळ करीत मारहाण केली.

यातील सचिन दिघे याने त्याच्या हातातील चाकूने माझ्या हातावर दुखापत केली. घरात अनाधिकाराने घुसून पत्नी व भावजई यांना शिवीगाळ केली. तसेच मला घरातून ओढून आणून तुला जीवे मारून टाकतो. तुझे तुकडे करतो. असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व मारून टाकण्याची धमकी दिली.अशा आशयाची फिर्यादी दिल्याने संगमनेर तालुका पोलिसांनी वरील तिघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तळेगाव येथे दिघे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व संगमनेर तालुक्यात अशी दहशत यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देखील दिला आहे. या प्रकरणातील आरोपी बाबासाहेब प्रभाकर कांदळकर हे तळेगाव दिघेचे सरपंच असून सचिन रामनाथ दिघे हे संगमनेर शेतकी संघाचे विद्यमान संचालक आहेत.

