शिक्षणाचे लोकशाहीकरण महत्त्वाचे – प्रा. शरद बाविस्कर
बीएसटी महाविद्यालयात “भुरा” कादंबरीवर परिसंवाद
प्रतिनिधी —
शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषितूनच मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. समृद्ध समाजासाठी शिक्षणाचे लोकशाहीकरण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जेएनयु विद्यापीठ नवी दिल्ली येथील फ्रेंच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि भुरा या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन या’ विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे हे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे होत्या. तर व्यासपीठावर सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उप प्राचार्य प्रा. शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ. समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट प्रा. तुळशीराम जाधव, हेमलता राठोड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. बाविस्कर म्हणाले की, आपण ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन मोठे झालो. बोलीभाषेला आपण कायम प्राधान्य दिले. शिक्षण जीवनात परिवर्तन करून त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचे असते. मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. खऱ्या अर्थाने बौद्धिक क्षमतेचा विकास मातृभाषेमुळेच होतो. पूर्वी धार्मिकतेसाठी शिक्षण घेतले जायचे. मात्र आता प्रत्येकाला बौद्धिक विकास व व्यक्त होण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणामुळे प्रश्न निर्माण होतात. प्रश्नांतून बौद्धिक चिकित्सा वाढते. बोली भाषेच्या वाढीसाठी सकस साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे.

प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असून तो का व कसा आहे हे प्रत्येकाला कळाले पाहिजे. सध्या नागरिक नव्हे तर भक्त घडवण्यासाठी शिक्षणाकडे काही लोक पाहत आहेत. साहित्य, संस्कृती, शिक्षणाचे लोकशाहीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
तर प्रा रंगनाथ पठारे म्हणाले की, जीवनात संघर्ष अपरिहार्य असतो. त्या संघर्षातून उभे राहण्यासाठी शिक्षण चांगले साधन आहे. प्रत्येकाने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका. असेही ते म्हणाले

तर दुर्गा तांबे म्हणाल्या की, वाचनामुळे जीवनाला समृद्धी प्राप्त होते. सर्वांनी वाचनावर भर दिला पाहिजे. संगमनेर मध्ये वाचन चळवळ मोठी असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रा. शरद बाविस्कर यांच्या “भुरा” या आत्मचिंतन ग्रंथावर डॉ. दीनानाथ पाटील यांनी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात परिसंवाद घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले सूत्रसंचालन डॉ. स्वाती ठोंबेरे यांनी केले तर प्रा. शिवाजी नवले यांनी आभार मानले. यावेळी शहरातील वाचनप्रेमी, विद्यार्थी, उपस्थित होते.

