इच्छाशक्तीच्या जोरावर उद्योगात यशस्वी होता येते – डॉ. प्रमोद भालेराव
प्रतिनिधी —
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते तेवढी मेहनत स्वतःचा व्यवसायाच्या निर्मितीसाठी केल्यास इच्छाशक्ती आणि नावीन्यतेचा ध्यास या जोरावर उद्योगात यशस्वी होता येते असे प्रतिपादन युरेका इंडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रमोद भालेराव यांनी केले.

संगमनेर महाविद्यालय इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल आयोजित “माय स्टोरी मोटिवेशनल सेशन बाय सक्सेसफुल इनोवेटर्स” या कार्यशाळेप्रसंगी ते महाविद्यालयात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गोरक्षनाथ सानप, बीबीए विभाग प्रमुख डॉ. शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. भालेराव म्हणाले की, व्यवसायिक क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याची तयारी आणि जगाकडे बघण्याची उघडी नजर प्रत्येक व्यावसायिकाला पुढे घेऊन जात असते. समाजाचा, कुटुंबीयांचा विरोध ही सामान्य बाब आहे. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे, छोट्या छोट्या गोष्टी पासून सुरुवात करणे आणि प्रमाणिकपणे कार्य करणे या बाबी व्यवसायासाठी अत्यावश्यक आहेत.

नोकरीमधून मिळणारे फायदे हे मर्यादित असतात मात्र व्यवसायातून मिळणारे फायदे अधिक असतात. व्यवसायात असणारे धोके कमी करण्यासाठी एकाच वेळी अनेक व्यवसाय करून आपण ते धोके कमी करू शकतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी चित्रफितीच्या आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्यांचे समाधानकारक निरासारण केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तरुण उद्योजकांनी सकारात्मक ऊर्जेने व्यवसायात पदार्पण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात भारतातील तरुणांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण केल्यास भारताचा विकास आणि परिणामी सर्वांगीण विकास सहज शक्य असल्याचेही ते म्हणाले.
इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल आयोजित सदर कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.प्रवीण रॉयलवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय नाविन्यता दिवसाचे आयोजनही करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थितीत होते.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार निवेदन बीबीए विभाग प्रमुख डॉ. शुभांगी कुलकर्णी यांनी करून दिला.आभार प्रदर्शन डॉ.प्रवीण रॉयलवार यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक शहाजी लेंडे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कौन्सिलच्या सर्व सदस्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

