समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद !
एकविरा फाउंडेशन चा उपक्रम
प्रतिनिधी —
एकविरा फाउंडेशनच्या वतीने समाजातील विविध घटकांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्यासाठी त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम करण्यात आला आहे. नवरात्रोत्सवात नवदुर्गांचा सन्मान होत असताना समाजातील यशस्वी महिलांच्या कर्तृत्व भरारीचा इतर महिलांना अनुकरणीय असा हा कार्यक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

डॉ. जयश्री थोरात यांनी तळागाळातील महिला व मुलींच्या उन्नतीसाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली असून या फाउंडेशनच्या वतीने तालुक्यात अनेक संकल्पना राबवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजातील महिलांना व मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, अध्यात्म व राजकारण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांनी केलेले कार्य व त्यांचे अनुभव त्या कर्तुत्वान महिलांशी संवाद साधून समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे.

या संकल्पनेमध्ये निलांबरी कोर्टीकर या गायिकेशी संवाद झाला त्यांनी स्वतःचे अनुभव व गायक होण्यासाठी काय करावे याची माहिती दिली. तसेच प्रसिद्ध कीर्तनकार सुनीताताई कातोरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी कीर्तनकार होण्यासाठी काय करावे याविषयी आपल्या मुलाखतीत सांगितले. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व सायकलवर महाराष्ट्र भ्रमंती करणाऱ्या प्रणाली चिपटे यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रवासाविषयी अनुभव महिलांशी शेअर केले. योगा विषयी समाजातील महिला व मुलींना माहिती व्हावी यासाठी लहान वयात योगामध्ये पारंगत असलेल्या रुणझुण फटांगरे या मुलीने योगा व योगामुळे आपल्या आरोग्यास काय फायदा होतो हे सांगितले.

एकविरा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा महिलांनी व मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या वतीने करण्यात आले आहे.

