मराठा सेवा संघाचा मराठा जनसंवाद दौरा उत्साहात संपन्न !

प्रतिनिधी —

महिलांनी कोणत्याही कामाची लाज न बाळगता विविध व्यवसायात पारंगत झाले पाहिजे.विशेषतः सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विज्ञानवादी विचारसरणी स्वीकारावी यासाठी मराठा सेवा संघ सदैव प्रयत्नशील आहे. समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा नष्ट करून कालानुरूप बदलाप्रमाणे विज्ञानवादी समाज घडवण्याचे काम केले जात आहे. फक्त नोकरीवर अवलंबून न राहता सरकारी मदतीची वाट न पाहता जमेल तो व्यवसाय करायला हवा. मराठा सेवा संघात महिलांना मानाचे स्थान आहे. घरोघरी जिजाऊ पारायण होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने पुढे यावे व चांगला समाज घडवावा असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे यांनी केले.

संगमनेर मराठा सेवा संघाचा जनसंवाद संगमनेर शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, मार्गदर्शक चंद्रकांत नवले संपतराव देशमुख, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सदस्य दीपाली पानसरे, जिल्हाध्यक्ष श्रद्धा वाणी, जिल्हा उपाध्यक्ष वृषाली कडलग आदी उपस्थित होते.

प्रा.अर्जुनराव तनपुरे पुढे म्हणाले की, मराठा सेवा संघ ही १९९० साली १६० सभासदांवर स्थापन झालेली सामाजिक संघटना आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. शासकीय, निम शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, वकील, उद्योजक, व्यावसायिक, महिला भगिनी मिळून सभासद संख्या १ कोटीच्या वर झाली आहे. अगदी सामान्य माणसापासून ते वर्ग १ अधिकाऱ्यांपर्यंत लाखो लोक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष माधुरी शेवाळे, तालुका उपाध्यक्ष सुवर्णा खताळ, तालुका कार्याध्यक्ष नीलम शिंदे, संगमनेर शहराध्यक्ष वृषाली साबळे, सचिव स्नेहलता कडलग, प्रसिद्धी प्रमुखॲड. सीमा काळे, सहसचिव जयश्री चव्हाण, जवळे कडलग शाखा अध्यक्ष श्रद्धा देशमुख, उज्ज्वला देशमुख, प्रियांका सुलताने, मयुरी गाडेकर, अनुराधा काळे, कावेरी राहाणे आदी उपस्थित होते.

यावेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्रद्धा वाणी यांनी जिल्ह्याचा आढावा सादर करत जिल्हा पातळीवर निवड प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत होतकरू महिलांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी जनसंवाद दौऱ्याचा हेतू स्पष्ट करत बहुजन समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नशील असल्याचे सांगितले. दुर्गा तांबे यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात आघाडीवर असणाऱ्या संगमनेर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचे कौतुक केले. स्पर्धेच्या युगात महिलांनी बदलत्या काळानुरूप महिलांनी बदलणे गरजेचे आहे. मात्र आपली संस्कृती टिकवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी शेवाळे यांनी केले तर आभार दिपाली पानसरे यांनी मानले.

जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षपदी वृषाली कडलग तर कार्याध्यक्षपदी निर्मला गुंजाळ

याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वृषाली कडलग, जिल्हा कार्याध्यक्षपदी निर्मला गुंजाळ, मालदाड ग्राम शाखा अध्यक्षपदी सुधा नवले यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!