कुपोषित बालकांना इनरव्हील तर्फे पूरक पोषण आहार
प्रतिनिधी —
भारत देश हा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना आदिवासी भागातील बालकांमध्ये आजही कुपोषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. श्रीमंती आणि गरिबी यामधील विषमता या निमित्ताने अधोरेखित असून या पार्श्वभूमीवर सामाजिक संवेदना जागृत ठेवणाऱ्या सामाजिक संस्थानी कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी केले.

राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर तर्फे पूरक पोषण महाअभियान सप्ताहा निमित्ताने अकोले तालुक्यातील राजुर येथील दत्त मंदिर येथे अंगणवाडी सेविकांच्या मदतीने कुपोषित बालकांना पूरक पोषण आहार, टॉनिक, मल्टी विटामिन, चवनप्राश, पूरक पोषण आहार अशा साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजूरच्या सरपंच पुष्पाताई निगळे तर व्यासपीठावर डॉ. नीलम शिंदे, पुष्पा किरण लहामटे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शैला गवारी उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कडलग पुढे म्हणाल्या की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा साजरा करत असताना आजही कुपोषित मुले आढळून येत आहेत ही दुर्दैवी बाब आहे. देशातील लहान मुलेच जर कुपोषित असतील तर भारत देश महासत्ता कसा बनेल असा प्रश्नही कडलग यांनी उपस्थित केला. शासनाच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असतानाही कुपोषण दूर होत नसेल तर हा पैसा कुठे झीरपतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बालरोग तज्ज्ञ डॉ. नीलम शिंदे यांनी कुपोषणाबाबत मार्गदर्शन केले. कुपोषण ही लहान मुलांमधील गंभीर समस्या असून त्यावर मात करण्यासाठी पालकांसह समाजानेही आपले योगदान दिले पाहिजे. अतिकुपोषित बालकांना पूरक आहार म्हणून प्रोटीन्स व मल्टी विटामिन मिळाले पाहिजे. आपल्याकडील सर्व फळे आणि भाज्यांमधून या गोष्टी मिळत असतात असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैला गवारी यांनी तर आभार प्रदर्शन लेंभे यांनी केले.

