हयातीचे दाखले घेण्यासाठी महसूलयंत्रणा गाव, वाड्या-वस्त्यांवर !

राहाता तालुक्यात ३ हजार लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त

 प्रतिनिधी – 

सामाजिक विशेष सहाय्य योजनेच्या हयातीचे दाखले सादर करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा मारणाऱ्या लाभार्थ्यांना यावर्षी सुखद धक्का बसला.

राज्य सरकारने आयोजित केलेल्या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून राहाता तालुक्यातील लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्रत्यक्ष गावात भेट देऊन प्राप्त करण्यासाठी गावपातळीवर शिबिरे घेण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलयंत्रणेला दिले. महसूलमंत्र्यांच्या या आदेशानुसार तहसीलदार कुंदन हिरे यांनी तत्परतेने तालुक्यातील पाचही मंडळातील गावांमध्ये शिबिरे घेण्याचे नियोजन केले. २१ ते २३ सप्टेंबर २०२२ या तीन दिवसातच गावपातळीवरील शिबिरांच्या माध्यमातून तब्बल ३ हजार लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात आले.

सामाजिक विशेष सहाय्य योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजना ४५२७ , श्रावण बाळ निराधार अनुदानयोजना ५३०९ , इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना २६८८, इंदिरा गांधी विधवा अनुदान योजना १२६ असे एकूण १२६५० लाभार्थी तालुक्यात आहेत. या लाभार्थ्यांना दरमहा १ कोटी २७ लाख रूपयांचे अनुदान वर्ग करण्यात येते. मागील वर्षी अनुदानापोटी १५ कोटी २४ लाख रूपये वाटर करण्यात आले . या लाभार्थ्याना प्रतिमहा १००० रूपये तर लाभार्थी महिला विधवा व तिला एक अपत्य असल्यास ११०० रूपये, विधवा महिलेचे दान अपत्य असल्यास १२०० रूपये अर्थसहाय्य शासनाकडून दिले जात असते. लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ देतांना दरवर्षी हयातीचा दाखला महसूलयंत्रणेकडून तपासला जातो. ज्यांचे हयातीचे दाखले प्राप्त नसतील त्यांचे अनुदान तात्पुरते बंद करण्यात येते.

राहाता तालुक्यातील १२६५० लाभार्थ्यांपैकी ३६०० लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त नसल्यामुळे त्यांना अनुदान वितरित केले जात नव्हते. याबाबत तहसील कार्यालयाकडून चार ते पाच वेळा जाहीर प्रसिध्दी निवेदन देण्यात आले. गाव,पाड्या-वस्त्यांवर जाहीर आवाहन करणारे फलक, नोटीस लावण्यात आल्या. मात्र तरीही लाभार्थ्यांकडून हयातीचे व उत्पन्नाचे दाखले मिळत नव्हते. अनुदान बंद झालेल्या लाभार्थ्यांनी थेट आपले गाऱ्हाणे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडले. हयातीचे व उत्पन्नाचे दाखले प्राप्त करून घेण्यापासून ते सादर करण्यापर्यंत लाभार्थ्याची होणारी ससेहोलपट लक्षात घेता महसूलमंत्र्यांनी राहाता तहसीलदारांची बैठक घेतली व त्यांना गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.

महसूलमंत्र्यांच्या सूचनेनुसार राहाता तालुक्यातील राहाता, शिर्डी, बाभळेश्वर, पुणतांबा व लोणी या मंडळातील राहाता, खडकेवाके, अस्तगांव, केलवड, नांदुर्खी, रूई, शिर्डी, कोल्हार, राजुरी, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, पुणतांबा, शिंगवे, वाकडी, चितळी, पाथरे व आडगाव या गावांमध्ये २१ ते २३ सप्टेंबर २०२२ या तीन दिवसात शिबिरे घेण्यात आली. या गावांच्या आजू-बाजूच्या गावांमधील लाभार्थ्यांनाही शिबिरांमध्ये आमंत्रित करण्यात आले. यातीन दिवसाच्या शिबिरात ३ हजार लाभार्थ्यांचे हयातीचे व उत्पन्नाचे दाखले प्राप्त करून घेण्यात आले. उर्वरित ६०० लाभार्थ्यांमध्ये काही स्थलांतरित व काही मयत असल्याचे प्रशासनाने खातरजमा केली आहे.

हयात असलेल्या काही लाभार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्या शालीनी विखे पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप ही करण्यात आले आहे. खासदार डॉ.सुजय विखे पाटील व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी या शिबिरासाठी महसूलयंत्रणेला मार्गदर्शन केले आहे.

‘‘महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना व सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या शिबिरांमुळे हयातीचे व उत्पन्नाचे दाखले घरबसल्या गावातच मिळाले. यामुळे आम्हाला तलाठी कार्यालय व तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारण्याची गरज राहिली नाही’’ अशा शब्दात रेणुका बोळे, मंगल बागुल, इब्राहीम शेख, योगेश मेड व जनाबाई निरगुडे या लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!