नवरात्रोत्सवात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान !

१८ वर्षांवरील मातांची आरोग्य तपासणी होणार

प्रतिनिधी —

नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यातील महिलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०२२ या काळात १८ वर्षावरील सर्व मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी दिली आहे.

या अभियानासाठी आरोग्य विभागाने तयारी केली असून आरोग्य विभागाबरोबरच महानगरपालिका, आदिवासी तसेच महिला व बाल विकास विभागाची मदत घेण्यात येणार आहे. जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच अंगणवाडी केंद्रात यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ अशी शिबिराची वेळ असून स्त्री रोग तज्ज्ञांसह खासगी डॉक्टरांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे.

यामध्ये विशेषतः ३० वर्षावरील सर्व महिलांचे मुख, स्तन व ग्रीव्हेचा कर्करोग, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच १८ वर्षावरील सर्व महिलांचे उंची व वजनाचे मोजमाप, रक्तगट, हिमोग्लोबीन व इतर रक्त तपासणी करण्यात येणार आहे. कोवीड लसीकरण गरोदर मातांकरीता टी.डी.चे लसीकरण करण्यात येणार आहे. वजन वाढ, पोषण आहार, कुटुंब नियोजन पध्दती, व्यसन मुक्ती याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे.

अतिदुर्गम भागात प्रामुख्याने आदिवासी क्षेत्रात आरोग्य विभागाच्या भरारी पथकातील डॉक्टरांच्या माध्यमातून पाड्यांवर तसेच वस्तीमध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवातील तीन दिवस हे जास्तीत जास्त गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी चाचणीसाठी देण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचणी व तपासणी या काळात करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अभियानाची माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची २२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ यशस्वी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश आरोग्य, महिला व बाल कल्याण, महानगरपालिका व आदिवासी विभागाला देण्यात आलेले आहे.

१८ वर्षावरील सर्व महिलांनी या अभियानामध्ये सहभाग घेऊन अभियान १०० टक्के यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. अशी माहिती ही सांगळे यांनी दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!