शारदा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विशाल पडताणी तर उपाध्यक्षपदी सोमनाथ कानकाटे यांची निवड  

प्रतिनिधी —

तालुक्याच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. त्यात संस्थेच्या अध्यक्षपदी विशाल श्यामसुंदर पडताणी तर उपाध्यक्षपदी सोमनाथ सदाशिव कानकाटे यांची निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने या निवडी करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवण्यासह सभासद व ग्राहकांच्या हितासाठी कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रीया यावेळी उभयतांनी दिली.

संगमनेरच्या आर्थिक प्रगतीत मोठा वाटा असणार्‍या असंख्य सहकारी संस्थांमध्ये शारदा पतसंस्था आघाडीवर आहे. व्यापार्‍यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या या पतसंस्थेने संगमनेरच्या बाजारपेठेचे वैभव वाढवण्यास सातत्याने हातभार लावला आहे. पारदर्शी आणि प्रामाणिक व्यवहाराच्या जोरावर संस्थेने १५१ कोटींच्या ठेवींसह १०९ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज वाटपही केले आहे. विशेष म्हणजे झोकून काम करणार्‍या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने मोठे परिश्रम घेत संस्थेचा एनपीए शून्य टक्क्यांवर ठेवण्यात यश मिळविले आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलतांना पडताणी यांनी संचालक मंडळाने दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरविण्याची ग्वाही दिली. सभासद व ग्राहकांनी संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेले आहे. त्यांच्या हितासाठी नेहमीच तत्पर राहून अधिक जलद सेवा देण्यासाठी आधुनिक संसाधनांचा वापर करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष कानकाटे यांनी संस्थापकांनी ठरवून दिलेल्या मार्गावर चालतांना संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उभय पदाधिकार्‍यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेतील ठेवींचा आकडा दोनशे कोटीच्या पार जाईल असा विश्‍वासही व्यक्त केला. संस्थेचे मार्गदर्शक व संचालक गिरीश मालपाणी यांनी संस्थेची चालू वर्षातील स्थिती व प्रगतीचा आलेख मांडतांना नूतन संचालकांकडून पथदर्शी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी सुवर्णा मालपाणी, उद्योजक मनिष मालपाणी, श्रीगोपाल पडताणी, राजेश झंवर, प्रकाश कलंत्री, राणीप्रसाद मुंदडा, प्रकाश राठी, ओंकार बिहाणी यांच्यासह संचालक मंडळातील मावळते अध्यक्ष डॉ.योगेश भुतडा, उपाध्यक्ष अमर झंवर, कैलास आसावा, संकेत कलंत्री, सुमीत अट्टल, राजेश लाहोटी, रोहित मणियार, राजेश रा. मालपाणी, कैलास राठी, उमेश झंवर, राजकुमार पोफळे, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतिका बाहेती, जगदिश टोकसे, लक्ष्मीनारायण पलोड, व्यवस्थापक माधव भोर, सहाय्यक व्यवस्थापक विलास सांगळे, शाखा व्यवस्थापक श्रीराम साळुंखे यांच्यासह संस्थेच्या सभासद व हितचिंतकांची मोठी उपस्थिती होती.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!