पेटत्या कठ्यातून तेलाचे जळते गोळे अंगावर घेत…. ‘बिरोबा की जय’….!!

छायाचित्र – विलास तुपे, राजूर

आदिवासींची कठ्याची रोमांचकारी यात्रा उत्साहात संपन्न!

प्रतिनिधी —

संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असणारी आणि रोमांचक अशी पेटत्या काठ्यांची यात्रा कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडली. अकोले तालुक्यातील कौठवाडी या गावांमध्येही यात्रा भरते.

राजूर येथून जवळच असलेल्या कौठवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कठ्याची यात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली.

बिरोबाला नवस बोललेले भाविक डोक्यावर मडके (कठे) घेतलेले भाविक, मडक्याला छिद्रे पाडून, मडक्यात उकळलेले तेल टाकून नवस फेडण्या साठी हे पेटते कठे डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारत असतात. त्यावेळी बिरोबाच्या नावाने घोषणा दिल्या जातात. हे रोमांचकारी दृष्य पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले असतात.

यावर्षी ही संख्या मोठी असल्याने डोक्यावर पेटये कठे डोक्यावर घेतल्यानंतरचे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते. रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी, तसेच नवस बोलण्यासाठी राज्यभरातून लोकांनी येथे गर्दी केली होती.

गावात श्री बिरोबादेवाचे मंदिर आहे. कठ्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी गर्दी केली होती. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला ‘कठा’ लावून नवस बोलला जातो. हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

कठा म्हणजे मडक्याची घागर. मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात. त्यात गोडेतेल टाकून चांगली भिजवतात. घागरीच्या चोहोबाजूंनी पांढरे शुभ्र कापड गुंडाळून, वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात. हे कठे बिरोबा मंदिरात ठेवतात. साकिरवाडी येथून सात  वाजता मानाची काठी येते व ‘बिरोबा की जय’ अशा घोषात ढोल, ताशांच्या गजरात कठे पेटविले जाऊन यात्रेला सुरूवात होते.

मंदिराभोवती उघड्या अंगाने, डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेले तेल, डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. गत दोन वर्षा कोरोना मुळे यात्रा बंद होती.  यंदा त्यात भर पडून ९१ कठे पेटविले होते. भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती दत्ता भोईर यांनी दिली.

पुजारी भोईर यांना बिरोबाच्या पूजेचा मान मिळाला. त्यांनी यथोचित पूजा करून सामुदायिक आरती केली. साकिरवाडी येथून मानाच्या काठीचे आगमन झाले. पुजाऱ्याच्या अंगात येताच कठे पेटले व मोठा अग्नीचा भडका झाला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कठे आले.  बिरोबा की जय म्हणत मंदिराभोवती ५ फेरे मारून भाविकांनी नवस फेडले. काहींनी नवसही केले.

सरपंच  ग्रामस्थांनी नियोजन केले. कठ्याच्या यात्रेस चांगलीच गर्दी उसळली होती.  मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या साठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त करण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!