छत्रपती शाहू महाराजांना यशोधन कार्यालयाचे अभिवादन !

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी आरक्षण आणि शिक्षणाचा मार्ग खुला केला – डॉ. जयश्री थोरात
प्रतिनिधी —
शिक्षण व नोकरीत आरक्षण लागू करतांना शिक्षणातून विकासाची क्रांती घडविणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी देशात सर्वप्रथम बहुजन समाजासाठी आरक्षण आणि शिक्षण खुले केले असल्याचे प्रतिपादन डॉ. जयश्री थोरात यांनी केले असून शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृतीशताब्दी निमित्त यशोधन जनसंपर्क कार्यालयाने १०० सेकंद स्तब्ध उभे राहून त्यांना अभिवादन केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित अभिवादन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, रामहरी कातोरे, पी. वाय. दिघे आदि उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे कोल्हापूर येथे मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांना राज्यभरात अनेक ठिकाणी १०० सेकंद स्तब्धपणे उभे राहून अभिवादन करण्यात आले.
थोरात म्हणाल्या कि, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसह संत, राष्ट्रपुरुषांचा मोठा वारसा लाभला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण सुरु करुन बहूजनांना विकासाची मोठी संधी निर्माण करुन दिली. त्यांनी कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी देण्याच्या हेतूने धोरण त्यांनी आखले. जाती, प्रथा व अंधश्रध्दे विरुध्द त्यांनी आवाज उठविला. समाजात जागृती निर्माण केली. विज्ञानवादी विचार जोपासले. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, विधवा पुर्नविवाहला मान्यता दिली. शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला यासह राधानगरी धरणाची उभारणी करुन जलसंधारणाचे महत्व समजावून दिले असल्याचेही त्या म्हणाल्या.

बाबा ओहोळ म्हणाले की, विकासाच्या क्रांतीला सुरुवात करणारे राजर्षी शाहू महाराज यांचे समतेचे विचार पुढच्या पिढ्यांनी सदैव जोपासले पाहिजे. शाहू महाराजांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे आज विविध समाजातील अनेक तरुण वेगवेगळ्या विभागात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा मोठा समृध्द वारसा असून तो पुढील पिढ्यांनी सातत्याने जपावा असे आवाहन ही त्यांनी केले.
याप्रसंगी शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
