महिलांच्या आरोग्यासाठी सेविकांनी विशेष योजना राबवाव्यात — डॉ. जयश्री थोरात

पठार भागातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविकाशी संवाद
प्रतिनिधी —
कोरोनाच्या संकटात तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका व आरोग्य सेविका यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असून याकरीता सर्व महिलांनी चांगला आहार घ्यावा. याच बरोबर महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी तालुक्यातील सर्व सेविकांनी विशेष योजना राबवावी असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील साकुर येथे ग्रामीण रुग्णालयात आयोजित अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी समवेत जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, सरपंच मंदाकिनी खेमनर, कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, सचिन खेमनर, डॉ. वैरागर, महेश वाव्हळ, विजय हिंगे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयातील सॅम मॅम, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी विविध सुविधा याचीही माहिती घेतली.

थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. या सर्व वाटचालीमध्ये तालुक्यातील महिलांचाही मोठा सहभाग आहे. कारण प्रत्येक कुटुंबातील महिला ही त्या कुटुंबाच्या प्रगती करता मोठे योगदान देत असते. मात्र हे सर्व करत असताना ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. सध्या ग्रामीण भागातील महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे चिंताजनक आहे. चांगला आहार व पुरेसा आराम शरीराला आवश्यक असतो. यामधून मोठ्या व्याधी टाळता येतात.

कॅन्सर सारख्या आजारात बद्दल आपण भीती बाळगतो. परंतु यावर वेळीच उपचार केले तर त्यावर पूर्णपणे मात करता येते. महिलांच्या आरोग्य समस्या असेल तर आपणास कधीही संपर्क करावा असेही यावेळी त्या म्हणाल्या.
तर शंकर खेमनर म्हणाले की, या भागातील वाडीवस्तीवर अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मध्ये भेट देऊन या रुग्णालयांमधून जास्तीत जास्त चांगली सुविधा मिळेल याकरिता काम सुरू केले असल्याचे ते म्हणाले.

तर सभापती मीरा शेटे म्हणाल्या की, डॉ. जयश्री थोरात यांनी फाउंडेशन च्या माध्यमातून मागील तीन वर्षे सातत्याने महिलांच्या आरोग्याच्या साठी विविध उपक्रम राबवले आहेत. पठार भागातील महिला या मोठ्या कष्टाळू असून त्यांच्या ही आरोग्याची काळजी कशी घेतली जाईल यासाठी डॉ. थोरात सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. यावेळी पठार भागातील व साकुर गावातील विविध कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
