राज्य सरकारकडे मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी पैसे आहेत, परंतु बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी नाही !

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची खंत
प्रतिनिधी —
इंदूमिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम निधी अभावी रखडले आहे. त्यांचे नाव घेवून सत्ता भोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडे मंत्र्याच्या बंगल्यांसाठी पैसे आहेत, परंतू स्मारकाच्या कामाला निधी नाही अशी खंत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

समता तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनानिमित्त लोणी खुर्द येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात विखे पाटील यांनी इंदूमिल येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख करून आघाडी सरकारवर निशाणा साधतानाच, लंडन येथील त्यांच्या निवासस्थानाला आंतराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे काम भाजप सरकारने केल्याचे आवर्जुन सांगितले. इंदुमिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून निधीची उपलब्धता करुण देण्याची मागणी त्यांनी केली.

जेष्ठ कार्यकर्ते वाय.बी. ब्राम्हणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी सभापती बापूसाहेब आहेर, शांतीनाथ आहेर, कारखान्याचे संचालक संजय आहेर, बाळासाहेब आहेर, दादासाहेब घोगरे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, मायकल ब्राम्हणे, संतोष आहेर, दिलीप ब्राम्हणे, नानाभाऊ ब्राम्हणे, लुकस ब्राम्हणे, एस.पी आहेर, रविराज आहेर, मंगेश आहेर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर हे केवळ क्रांतीचा भाग नव्हते तर ते क्रांतीचे जनक होते. असा गौरवपूर्ण उल्लेख करून विखे पाटील म्हणाले की, हतबल निराश आणि गलितगात्र झालेल्या समाज मनामध्ये क्रांतीची ज्योत पेटविण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यामुळेच समाज परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली. बाबसाहेब केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर, सर्वच समाज घटकांना त्यांचे न्याय हक्क मिळवेत म्हणून संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम या लोकशाही प्रधान देशाला पुढे घेवून जाण्यास उपयुक्त ठरले. त्यामुळेच विश्वनेते म्हणून त्यांचा होत असलेला गौरव आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा असल्याचे त्यांनी नमुद केले.

शेतकरी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना जातीभेदाची किड नष्ट झाली तरच देश एकसंघ राहील हा त्यांचा विचार ठाम होता. परंतू शिक्षणानेच समाजाची वैचारीक आकलन शक्ती वाढेल आणि हक्काची जाणीव होईल हा त्यांनी दिलेला संदेश बलशाली भारतासाठी मोलाचा आहे. त्या विचारानेच पुढे जाण्याचे आवाहन आमदार विखे पाटील यांनी केले.
जयंती दिनाचे औचित्य साधून समता संघटनेच्या वतीने जेष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात आला. कोव्हीड योद्धे म्हणून आशा सेविका तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे वितरण करण्यात आले.

लोणी बुद्रुक येथेही विखे पाटील यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, भाऊसाहेब विखे, भाऊसाहेब धावणे, नितीन ब्राम्हणे, सागर ब्राम्हणे, संजय साबळे, सरोज साबळे, आण्णा ब्राम्हणे, सिध्दार्थ साबळे, अनिल ब्राम्हणे, सोमनाथ ब्राम्हणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यानिमित्ताने किराणा किटचे वाटप करण्यात आले.प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विखे पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्हा.चेअरमन विश्वासराव कडू यांच्यासह सर्व संचालक आणि आधिकारी उपस्थित होते. लोहगाव येथे जनसेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास विखे यांनी भेट दिली.

