भारतरत्न डॉ. आंबेडकर हे जगाला समतेचे तत्व  देणारे किमयागार —       महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर मध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी —

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ झाल्यानंतर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पाया रचणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशासह जगाला समतेचे तत्व देणारे  किमयागार ठरले असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर मध्ये भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, प्रा. शशिकांत माघाडे, सुनंदा जोर्वेकर नवनाथ आरगडे, सिताराम राऊत, किसन हासे, ॲड. अमित सोनवणे, कुसुम माघाडे, विलास दारोळे, गौतम गायकवाड, के.एस. गायकवाड, विनोद गायकवाड, राजू खरात, प्रवीण गायकवाड, शिवाजी जगताप, नितीन अभंग, सुभाष सांगळे, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भारतीय राज्यघटना व लोकशाहीचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घातला. संपूर्ण जगाला समता व बंधुता हा मंत्र त्यांनी दिला आहे. अत्यंत विद्वान असलेले हे व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिभावंत व्यक्तिमत्व ठरले आहे.   गोरगरीब समाजातील प्रत्येक मुलगा शिक्षण घेऊन पुढे गेला. त्याने त्याचे कुटुंब व आरोग्य व्यवस्था चांगली केली हे खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन ठरणार आहे.

विविध समाज सुधारक व राष्ट्रपुरुष यांना एका जातीच्या किंवा समाजाच्या चौकटीत अडकवणे योग्य नसून ही व्यक्तिमत्वे सर्व समाजाची आहेत. मानवतेच्या विकासाचे त्यांचे विचार आपण एकत्रितपणे पुढे नेले पाहिजेत.

मानवतेच्या या पुरोगामी विचारावर सध्या मोठे संकट आले आहे. पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षातून आपल्याला राज्यघटना मिळाली असून तिच्या प्रस्तावनेतच सर्व सामावलेले आहे. मात्र  काही प्रतिगामी शक्ती सध्या धर्माच्या नावावर  माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करत असून या लोकांना थांबवण्यासाठी प्रत्येकाने राज्य घटनेतील तत्वे, विचार हा जनसामान्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. हा देश व राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.

तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता व बंधुता या तत्वांच्या विरोधात काही धर्मांध शक्ती सध्या काम करत आहेत. दररोज राज्यघटना कमकुवत केली जात आहे. धर्माच्या नावावर राजकारण करून समाजात समाजात तेढ निर्माण केली जात आहे. या जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा द्यावा असे आवाहन केले.

दुर्गा तांबे म्हणाल्या की, महाराष्ट्राला व संगमनेर तालुक्याला पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे. संगमनेर मध्ये नगरपरिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वप्रथम ग्रंथालय सुरू केले असून  रमाई उद्यान सुद्धा सुरू केले आहे. समाजाच्या एकात्मतेसाठी शिक्षणाचा विचार घेऊन आपण सर्वांनी पुढे जाऊ असे त्या म्हणाल्या.

संगमनेर शहरात व तालुक्यातील विविध गावांमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!