अहमदनगर चे ‘अमृत जवान अभियान’ आता राज्यभर राबविले जाणार
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची संकल्पना
प्रतिनिधी —
माजी सैनिक, शहीद जवान, जवान विधवा, जवान कुटुंबिय व सेवेत कार्यरत सैनिकांची शासकीय कामे विनाविलंब व कमीत कमी कागदपत्रांमध्ये पूर्ण व्हावी. यासाठी अहमदनगर जिल्ह्यात “अमृत जवान अभियान २०२२” हा स्तुत्य उपक्रम ७ फेब्रुवारी २०२२ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत राबविण्याचा येत आहे. या उपक्रमाची यशस्विता व उपयोगिता लक्षात घेता आता हे अभियान राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यात १ मे पासून राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव शिवाजी गोरे यांनी याबाबतचा शासननिर्णय १३ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध केला आहे. अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून राज्यात सर्वात प्रथम हे अभियान अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाला सैनिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे शासनाने या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत ‘अमृत जवान अभियान २०२२’ आता १ मे २०२२ ते १५ जून २०२२ या कालावधीत राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध विभागांमध्ये माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांची अनेक कामे प्रलंबित असतात. जसे, महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, बिनशेती व बांधकाम परवानगी, भूसंपादन व पूनर्वसन संबंधी अडचणी, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, इत्यादी. पोलिस विभागाकडे विविध तक्रारी/ समस्या, समाजकंटकांकडून त्रास होत असलेबाबत तक्रारी जमीन / जमिनींच्या हद्दी/ पाणी यावरुन होणारे फौजदारी स्वरुपाचे वाद, ग्रामविकास विभागाकडील विविध योजनांचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावरील रहिवास विषयक विविध बाबी इत्यादी.

कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ देण्याकरिता प्रस्ताव तयार करणे. सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे इत्यादी, परिवहन विभागाकडील परवाने इत्यादी, तसेच इतर अनेक विभागांकडील अशा कामांसाठी विशेष मेळावे घेऊन, माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न विशेष प्राधान्याने मार्गी लावाण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

सदर अभियानामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी “अमृत जवान सन्मान दिन” आयोजित करुन लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभाग प्रमुख व सैनिक अर्जदार यांचे उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेण्यात यावा तसेच सदर अभियानाच्या कालावधीत त्यांच्या प्रश्नांच्या निरसनासाठी विशेष मेळावे देखील घेण्यात यावेत.असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्यस्तरावर अहमदनगरच्या या अभियानाची शासनाने दखल घेतल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
